प्रत्येक तासाला दहा दुचाकीचालकांची बीआरटीएस मार्गात घुसखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 07:05 PM2018-08-04T19:05:38+5:302018-08-04T19:11:58+5:30
चुकीच्या पद्धतीने शॉर्ट कटचा अवलंब, रस्ता ओलांडण्यासाठी घुसखोरी करून जीवघेण्या पद्धतीने या जागेतून दुचाकीस्वार आणि पादचारी ये-जा करत आहेत. प्रत्येक तासाला सरासरी आठ ते दहा दुचाकीस्वार आणि किमान २५ ते ३० पादचारी या मार्गाचा अवलंब करतात.
वाकड : बस रॅपीड ट्रान्झीट सिस्टम अर्थात बीआरटीएस मार्गावर दिव्यांगांसाठी देण्यात आलेल्या सुविधेचा अन्यवाहनचालक गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. सांगवी ते किवळे या साडेचौदा किलोमीटर अंतराच्या बीआरटीएस मार्गात केवळ दिव्यांग बांधवांना ये-जा करण्यासाठी प्रत्येक बस थांब्याजवळ अडीच फुटांची जागा सोडण्यात आली आहे. मात्र, या सुविधेचा वापर दिव्यांग बांधवांऐवजी अन्य दुचाकीस्वार सर्रास करताना दिसत आहेत. चुकीच्या पद्धतीने शॉर्ट कटचा अवलंब, रस्ता ओलांडण्यासाठी घुसखोरी करून जीवघेण्या पद्धतीने या जागेतून दुचाकीस्वार आणि पादचारी ये-जा करत आहेत. त्यामुळे दिव्यांगांची कुचंबणा होत असून, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सांगवी ते किवळे या बीआरटीएस मार्गावर दिवसभर सुमारे ११० पीएमपीएमएल बस तब्बल १६०० फेऱ्या मारतात. तसेच या मार्गालगत असलेल्या नेहमीच्या मार्गावरदेखील मुंबईला जाण्यासाठी आणि खासगी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मात्र, बीआरटीएस मार्गात दुचाकीस्वार अचानक शिरल्याचे बसचालकाच्या लक्षात येत नाही. बीआरटीएस मार्ग ओलांडून तो पुन्हा मुख्य रस्त्याला लागताच या मुख्य मार्गावरील वाहनचालक गोंधळून जातात आणि अपघात होत आहेत.
डांगे चौक ते पुनावळे यादरम्यान अशी अनेक अपघात झाले आहेत आणि इथून पुढेही अपघात होतीलच यात शंका नाही. आयआयटी मुंबई यांच्या सल्ल्यानुसार बीआरटीएस मार्ग विकसित करताना दिव्यांगांची हेळसांड होऊ नये त्यांना सुविधा मिळावी म्हणून ही अडीच फुटांची जागा सोडण्यात आली आहे. बीआरटीएस मार्ग उभारताना ही जागा सोडण्यात आली नव्हती, अशा ठिकाणी नंतर ही सोय करण्यात आली. मात्र या सुविधेचा वापर करून दुचकीस्वार आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत.
......................
प्रत्येक तासाला दहा दुचाकीस्वारांची घुसखोरी
किवळे-रावेत-औंध या बीआरटीएस मार्गात २१ बसथांबे आहेत़. या प्रत्येक थांब्यावर ही जागा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे जाण्यासाठी दुचाकीस्वार वळसा मारून जाणे पसंत न करता शॉर्टकट मार्गाने थेट या बीआरटीएस मागार्तून अलीकडे पलीकडे करत आहेत. प्रत्येक तासाला सरासरी आठ ते दहा दुचाकीस्वार आणि किमान २५ ते ३० पादचारी या मागार्चा अवलंब करून रस्ता छेदून जात असल्याचे लोकमत पाहणीतून समोर आले आहे.
................................
बीआरटीएस मार्गावर केवळ दिव्यांगबांधवांसाठी ही अडीच फुटांची जागा ठेवण्यात आली आहे. दिव्यांगबांधवांना असुविधा होणार नाही त्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य वाहनचालकांनी आणि पादचाऱ्यांनी स्वयंशिस्त लावावी. त्या मागार्चा वापर न करता आपला जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडू नये.
- विजय भोजने, प्रवक्ते, बीआरटीएस, पिंपरी-चिंचवड महापालिका
.........................
बीआरटीएस मार्गालगत ताथवडेत माझे घर आहे. या मार्गानागरिक जीवघेणा प्रवास करीत असल्याचे मी नेहमी पाहते. असे करू नये म्हणून मी अनेकांना सांगतही असते. मात्र लोक तरीही याकडे दुर्लक्ष करून पुन्हा तोच कित्ता गिरवतात. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. नागरिकांनी स्वत:च्या जिवाचा विचार करून वाहतूक नियमांचे पालन करावे.
- सुप्रिया पवार, शहर उपाध्यक्षा, महिला आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस