'माझ्या लग्नाला सर्वानी आवर्जून...' अन् घडलं असं काही की, अंत्यविधीला उपस्थित राहण्याची आली वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 12:30 PM2024-04-17T12:30:12+5:302024-04-17T12:30:51+5:30
सोमवारी रात्री उशिरापर्यंत मित्रपरिवार आणि प्रतिष्ठितांना फोन करून आग्रहाची विनंती करणाऱ्या तरुणाचा मृतदेह तळेगावातील विहिरीत मंगळवारी सकाळी आढळला
विलास भेगडे
तळेगाव दाभाडे : ‘देहूगाव येथील गाथा मंदिराजवळील सरस्वती मंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी माझा लग्नसोहळा आहे. आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे,’ अशी सोमवारी रात्री उशिरापर्यंत मित्रपरिवार आणि प्रतिष्ठितांना फोन करून आग्रहाची विनंती करणाऱ्या सूरज रायकरचा मृतदेह तळेगावातील विहिरीत मंगळवारी सकाळी आढळला. त्यामुळे मित्रपरिवार आणि नातेवाइकांना प्रचंड धक्का बसला. त्याच्या लग्नास उपस्थित राहण्याऐवजी अंत्यविधीस उपस्थित राहण्याचा दुःखद प्रसंग नातेवाइकांवर ओढवला.
सूरजच्या लग्नाची सर्व जय्यत तयारी झाली होती; पण नियतीच्या मनात वेगळेच काही तरी होते. सूरजचा मृत्यू झाल्याने माळी आळीसह तळेगाव शहरावर शोककळा पसरली. सूरज आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. वडिलांचे निधन झाल्यानंतर घरची सर्व जबाबदारी त्याच्यावर आली. तो ठेकेदारीची कामे घेऊन उदरनिर्वाह करीत होता. अष्टविनायक मित्रमंडळाचा तो सक्रिय कार्यकर्ता होता. आजारी आईची देखभाल करणाऱ्या सूरजच्या निधनाची वार्ता समजतात त्याच्या आईने हंबरडा फोडला. सायंकाळी सहाच्या सुमारास त्याच्या पार्थिवावर श्री बनेश्वर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी नगरसेविका शोभा भेगडे म्हणाल्या की, लग्न समारंभासाठी सहकुटुंब सहपरिवार यावे, अशी आग्रहाची विनंती सूरजने केली होती. लग्न सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहण्याची तयारीही केली होती. मात्र, सकाळी ही घटना कळताच धक्का बसला. अतिशय वाईट वाटले.
भाजपचे तळेगाव शहराध्यक्ष अशोक दाभाडे म्हणाले की, चार दिवसांपूर्वी तो स्वतः लग्नपत्रिका घेऊन घरी आला होता. लग्नाला येण्याचा आग्रहही केला होता. मी लग्न समारंभास जाण्याचे निश्चित केले होते.
‘तो’ आत्महत्या करूच शकत नाही...
सूरज ‘छोट्या’ नावाने मित्रपरिवारामध्ये परिचित होता. तो सर्वांशी मिळून-मिसळून वागत असे. तो मनाने खंबीर होता. सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या छोट्याच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावून जाणारी आहे. तो आत्महत्या करूच शकत नाही, असा विश्वास त्याचा मित्र सचिन सुरेश जाधव याने व्यक्त केला. हे सांगताना तो भावुक झाला होता.