माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट उधळला; पिस्तूल जप्त करून तिघांना अटक

By नारायण बडगुजर | Published: June 28, 2023 07:08 PM2023-06-28T19:08:42+5:302023-06-28T19:09:01+5:30

किशोर आवारे यांचे निकटवर्ती असल्याने ते देखील हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज

Ex Corporator Shekhar Oval assassination plot foiled Pistol seized and arrested | माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट उधळला; पिस्तूल जप्त करून तिघांना अटक

माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट उधळला; पिस्तूल जप्त करून तिघांना अटक

googlenewsNext

पिंपरी : पुनावळे येथील माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्याकडून पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. राजकीय पदाधिकाऱ्याच्या हत्येचा कट या कारवाईमुळे उधळण्यात आला. माजी नगरसेवक असलेले शेखर ओव्हाळ हे भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या, हत्येचा कट रचल्याचे समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.

किशोर बापू भोसले (वय ३१, रा. पुनावळे), अमित दत्तात्रय पाटुळे (वय २३, रा. शिंदेवस्ती चौक, रावेत), अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले (वय ३४, रा. पुनावळे गावठाण), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार किशोर भोसले व अमित पाटुळे हे कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने पुनावळे येथील स्मशानभूमी येथे येणार असून त्यांचेकडे पिस्तूल आहे, अशी माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस नाईक आशिष बोटके आणि प्रदीप गोडांबे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि जिवंत दोन काडतुसे (राऊंड) जप्त केली. अमोल उर्फ धनज्या गोरगले याच्या सांगण्यावरून तडीपार आरोपी रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार याच्याकडून पिस्तूल आणले असल्याचे किशारे भोसले व अमित पाटुळे यांनी सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी अमोल गोरगले याला अटक केली. पिस्तूल आणण्याचा उद्देश आरोपींना विचारून पोलिसांनी अधिक चौकशी केली. माजी नगरसेवक यांच्याशी माथाडीच्या कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे त्यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी पिस्तूल आणल्याचे समोर आले आहे. 

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक निरीक्षक उद्धव खाडे, सहायक फौजदार अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलिस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, किरण काटकर, सुनील कानगुडे, प्रदीप गायकवाड, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

सलग दुसरा प्रकार 

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे दोन दिवसांपूर्वी दरोडा विरोधी पथकाने प्रमोद सोपान सांडभोर (वय ३३, रा. तळेगाव दाभाडे) आणि शरद मुरलीधर साळवे (वय ३०, रा. काळेवाडी), यांना चार पिस्तुलांसह अटक केली. आरोपी हे दिवंगत किशोर आवारे यांचे निकटवर्ती असल्याने ते देखील हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात खळबळ उडाली होती. त्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरात देखील हत्येचा कट रचून त्यासाठी पिस्तूल आणल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे शहरातही खळबळ उडाली.

Web Title: Ex Corporator Shekhar Oval assassination plot foiled Pistol seized and arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.