माजी माननीयांची चमकोगिरी, महापालिका पदाधिका-यांचे विनापरवाना फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 04:12 AM2017-11-26T04:12:29+5:302017-11-26T04:12:37+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील विनापरवाना फलकांवर दंडात्मक कारवाई प्रशासनाकडून केली जाते. मात्र, महापालिकेतील विविध माजी पदाधिकारी झाल्यानंतरही सार्वजनिक जागेतील नामफलक आणि दिशादर्शक फलकांना अभय देण्याचे काम सत्ताधारी आणि प्रशासनाकडून होत आहे.
- विश्वास मोरे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील विनापरवाना फलकांवर दंडात्मक कारवाई प्रशासनाकडून केली जाते. मात्र, महापालिकेतील विविध माजी पदाधिकारी झाल्यानंतरही सार्वजनिक जागेतील नामफलक आणि दिशादर्शक फलकांना अभय देण्याचे काम सत्ताधारी आणि प्रशासनाकडून होत आहे. माननीयांच्या चमकोगिरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उद्योगनगरीतील चमकोगिरी रोखणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेत पदाधिकारी झाल्यानंतर ‘निवास स्थानाकडे’ असा दिशादर्शक फलक लावण्याची पद्धत आहे. महापालिकेत परिसरातही पदाधिकाºयांचे फलक मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. एका पदाधिकाºयाच्या घराकडे येणारे जेवढे रस्ते असतील तिथे फलक लावले जातात. किती फलक लावावेत, किती खर्च करावा याबाबतचे धोरण महापालिकेचे नाही.
विविध भागांत मनमानीपद्धतीने हे फलक उभारले आहेत. विद्यमान पदाधिकारी सदस्यांचे फलक असणे गरजेचे असले तरी माजी आमदार, खासदार, माजी नगरसेवक किंवा महापौर, माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विधी समिती सभापती, स्वीकृत सदस्य, प्रभाग समिती सदस्य असे फलक उभारले जातात. त्यावर किती उधळपट्टी होते, याबाबत चौकशी करण्याची गरज आहेत. असे फलक भोसरी, चिंचवड, आकुर्डी, पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी, थेरगाव, वाकड, ताथवडे, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, चिखली, निगडी, कासारवाडी अशा विविध भागांत दिसून येत आहेत.
फलकांनीही टाकली कात
महापालिकेत सत्तांतर झाले. त्याचा परिणाम फलकांवरही झाला आहे. यापूर्वी महापालिका क्षेत्रात एकाच रंगाचे फलक होते. हिरवा आणि पांढरा असा फलकांना रंग होता. त्यात एकसूत्रीपणा होता. मात्र, आता सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांच्या पाट्यांवर भाजपाचे रंग दिसू लागले आहेत.
स्थायी समिती सभापतीच्या विद्यमान समितीच्या फलकांचा रंग बदलला आहे. सत्ताधारी बदलले की महापालिका सदस्यांच्या पाट्यांचा रंग बदलणे चुकीचे आहे. पाट्यांच्या रंगाविषयीचे आणि कोणत्या सदस्यांना नियमानुसार किती फलक लावता येतील याचे धोरण ठरविण्याची गरज आहे.
कारवाई करायला हवी
महापालिका क्षेत्रात माजी पदाधिकाºयांचे फलक त्यांच्या कालखंडानंतरही सार्वजनिक जागेमध्ये लावलेले आहेत. त्यांच्यावर महापालिका प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जात नाही. अन्य रस्त्यावर कोणी फलक लावला की त्यांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करतो. मात्र, माजी पदाधिकाºयांच्या फलकांना अभय दिले आहे. माजी सदस्यांच्या फलकांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.