पोलिस भरतीसाठी २८२८ उमेदवारांची ‘लेखी’; परीक्षेसाठी १६१ जण गैरहजर : २६२ जागांसाठी भरती
By नारायण बडगुजर | Published: August 10, 2024 07:52 PM2024-08-10T19:52:40+5:302024-08-10T19:52:51+5:30
या परीक्षेत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या आस्थापनेवरील २६२ पोलिस शिपाई पदांसाठी भरतीची लेखी परीक्षा शनिवारी (दि. १०) सकाळी दहा ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान ताथवडे येथील श्री बालाजी विद्यापीठ येथे पार पडली. पात्र ठरलेल्या २९८९ उमेदवारांपैकी प्रत्यक्ष २८२८ उमेदवार लेखी परीक्षेसाठी हजर होते. लेखी परीक्षेसाठी १६१ उमेदवार गैरहजर राहिले. या परीक्षेत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पिंपरी-चिंचवड पोलिस दलात २६२ पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी ७९, महिला १८, खेळाडू १५, प्रकल्पग्रस्त १४, भूकंपग्रस्त ४, माजी सैनिक ४१, अंशकालीन पदवीधर ११, पोलिस पाल्य ७, गृहरक्षक दल १३, अनाथ ३ पदे राखीव आहेत. भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून १:१० प्रमाणात उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले आहे. त्या उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. ४० टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र समजले जातील.
पोलिसांचे चोख नियोजन
लेखी परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी पिंपरी - चिंचवड पोलिसांनी चोख नियोजन केले होते. परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
परीक्षार्थींच्या राहण्याची सोय
लेखी परीक्षेसाठी राज्याच्या विविध भागातून उमेदवार पिंपरी - चिंचवड शहरात दाखल झाले होते. काही उमेदवार शुक्रवारी रात्री परीक्षा केंद्रावर आले. ३५० उमेदवारांची राहण्याची सोय पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे केली होती. शनिवारी सकाळी या उमेदवारांना चहा-नाश्ता देखील देण्यात आला.
साडेसहाशे पोलिसांचा फौजफाटा
लेखी परीक्षेसाठी चार पोलिस उपायुक्त, नऊ सहाय्यक पोलिस आयुक्त, ३१ पोलिस निरीक्षक, १३३ सहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, ४४४ पोलिस अंमलदार आणि २० वार्डन असा बंदोबस्त लावण्यात आला होता.
लेखी परीक्षेसाठी २९८९ उमेदवार पात्र
पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील २६२ जागांसाठी राज्यभरातून १५ हजार ४२ अर्ज आले. त्यामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनिअर यासह पदव्युत्तर पदवी धारकांचा देखील समावेश होता. दोन तृतीयपंथी उमेदवारांनी देखील अर्ज केला. मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखीसाठी २९८९ उमेदवार पात्र ठरले. उर्वरित १२ हजार ५३ उमेदवार मैदानी चाचणीमधून बाहेर पडले.