आश्चर्याचा उत्तम नमुना...!  ‘या’ गावात चक्क बँकेची एकही शाखा नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 03:23 PM2018-08-22T15:23:03+5:302018-08-22T15:32:08+5:30

डिजिटल इंडियातील स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या दोन मोठ्या शहरांच्या हद्दीतलं हे ३० हजार लोकसंख्येचं गाव

Excellent sample of surprises ...! There is no branch of Bank in this village | आश्चर्याचा उत्तम नमुना...!  ‘या’ गावात चक्क बँकेची एकही शाखा नाही 

आश्चर्याचा उत्तम नमुना...!  ‘या’ गावात चक्क बँकेची एकही शाखा नाही 

Next
ठळक मुद्देडिजिटल इंडियातील स्मार्ट सिटी : विविध योजनांच्या लाभापासून बोपखेलकर वंचितबँकेच्या शाखेत जाण्यासाठी नागरिकांना २० ते २५ किलोमीटर प्रवास रस्त्याच्या आंदोलनाने बोपखेल प्रकाशझोतात 

बोपखेल : डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारत असलेल्या केंद्र सरकारने जनधन योजना राबविली आणि बँकिंग क्षेत्राशी सर्वसामान्यांना जोडले. आदिवासी पाड्यापासून दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकास बँकेचे खाते उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, डिजिटल इंडियातील स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या दोन मोठ्या शहरांच्या हद्दीतलं तब्बल ३० हजार लोकसंख्येच्या गावात कोणत्याही बँकेची एकही शाखा नाही. त्यामुळे जनधनसह विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी या नागरिकांना कसरत करावी लागत आहे. याचा या नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होत आहे. त्यामुळे थेट केंद्र शासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना आणि उपक्रमांपासून हे नागरिक वंचित राहत आहेत.  
 पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महापालिका हद्दीत विभागलेल्या बोपखेल येथील लोकसंख्या ३० हजार आहे. परंतु, या भागात अनेक नागरी सुविधा आजही पोहोचलेल्या नाहीत. दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती असलेल्या बोपखेल गावात आजही कोणत्याही बँकेची शाखा नाही. त्यामुळे येथील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शासनाने खेडोपाडी व गावागावांत तेथील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा याकरिता बँक उपलब्ध करून दिल्या आहेत. शासनाकडून काही ना काही उपक्रम व योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये बँकांचा थेट संबंध येतो. या योजनांचा फायदा मिळवण्यासाठी बँकेत खाते असावे लागते. परंतु बोपखेलला बँकच नसल्याने येथील नागरिक या योजनांचा फायदा घेऊ शकत नाहीत. जन धन योजना, सुकन्या योजना किंवा गॅस सबसिडी अशा प्रत्येक योजनांचा थेट बँकांशी संबंध येतो. 
    बोपखेल, गणेशनगर, रामनगर या तिन्ही भागांत एकूण पाचशे ते सहाशे किराणा व व्यावसायिक दुकाने आहेत. येथील व्यापाऱ्यांनाही बँक नसल्याने आपला वेळ व पैसा खर्च करून दिघी, भोसरी, विश्रांतवाडी या ठिकाणी जाऊन आपल्या दुकानातील रोजचा व्यवहार करावा लागतो. या भागात तीन ते चार एटीएम मशीन आहेत. परंतु या मशीनमध्ये रोकड नसते. सातत्याने खडखडाट असल्याने एटीएम असूनही उपयोग होत नाही. त्यामुळे येथील नागरिकांची तारांबळ होते.
 महापालिकेत गावाचा समावेश झाल्यापासून येथील लोकवस्ती वाढत आहे. परप्रांतीय तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतील नागरिक बोपखेल येथे व्यावसायानिमित्त तर काही नोकरीनिमित्त बोपखेल गावात वास्तव्यास आहेत. कष्ट करून मिळविलेला पैसा जर गावी पाठवायचा असेल तर मनी ट्रान्सफर सेंटरचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु तेथेही मोठ्या प्रमाणात त्यांची लूट होत आहे. बोपखेल परिसरात बँक नाही म्हणून अनेक मनी ट्रान्सफर सेंटर उभारले आहेत. त्याच्याकडून गरजू नागरिकांची मोठी लूट होताना दिसत आहे.
   येथील नागरिक, समाजसेवक व व्यापारी यांनी एकत्रित येऊन अनेक राष्ट्रीय बँकांना साकडे घातले होते. मात्र कोणीही या भागात येण्यास तयारी दर्शवली नाही. या भागात बँक सुरू व्हावी याकरिता नागरिक वारंवार बँकांशी संपर्क करत आहेत. बँक नसल्याने येथील नागरिकांना अनेक व्यावहारिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बोपखेल, गणेशनगर व रामनगर येथील नागरिक बँकेच्या प्रतीक्षेत आहेत. 
 ......................
रस्त्याच्या आंदोलनाने बोपखेल प्रकाशझोतात 
बोपखेल येथील नागरिक दापोडीतील सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हद्दीतून ये-जा करीत होते. सुरक्षेच्या कारणास्तव सैन्य दलाने सीएमईतील हा रस्ता बंद केला. त्यामुळे बोपखेलकरांची अडचण झाली. संबंधित रस्ता सुरू करण्याची मागणी करीत बोपखेलकरांनी आंदोलन केले. हे आंदोलन चिघळले. त्यामुळे बोपखेल प्रकाश झोतात आले होते. सर्वच स्तरावर बोपखेलच्या रस्त्याची चर्चा झाली. मात्र अद्यापही बोपखेलकरांच्या रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यांना पयार्यी रस्ताही उपलब्ध झालेला नाही. त्यात बँकिंगसह अन्य नागरी सुविधांचा अभाव असल्याने बोपखेलकरांची कोंडी झाली आहे.
......................
स्वतंत्र बेट असल्यासारखी परिस्थिती
बोपखेलला लागून सैन्य दलाची मोठी जागा आहे. तसेच मुळा नदी आहे. सैन्य दलाने त्यांच्या हद्दीतील रस्ते बंद केले आहेत. मुळा नदीवर पूल नाही. त्यामुळे नदीतून प्रवास करता येत नाही. केवळ विश्रांतवाडी आणि दिघीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. सैन्य दलाची जागा आणि मुळा नदी यांचा वेढा असल्याने बोपखेल स्वतंत्र बेटासारखे झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराशी येथील नागरिकांचा सहज संपर्क होऊ शकत नाही.  
.............................
पिंपरीसाठी २० किलोमीटर प्रवास
विश्रांतवाडी आणि दिघी ते बोपखेलदरम्यानचे अंतर साडेचार ते पाच किलोमीटर आहे. बोपखेलकरांना बँकेच्या शाखेत जायचे असल्यास विश्रांतवाडी किंवा दिघीत जावे लागते. येथूनच पुणे किंवा पिंपरी-चिंचवडकडे बोपखेलकरांना जाता येते. पिंपरी ते बोपखेलदरम्यानचे अंतर २० किलोमीटर आहे. काही नागरिकांचे खाते दापोडी आदी भागांत आहे. या नागरिकांना बँकेच्या शाखेत जाण्यासाठी २० ते २५ किलोमीटर प्रवास करावा लागतो. 
................................
गणेशनगर भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक दुकाने आहेत. सर्व व्यापाºयांना आपले बँक खाती सुरू करण्यासाठी आसपासच्या भागात जावे लागते. परंतु दुसºया भागातील बँकांमध्ये मोठी गर्दी असते़ त्यामुळे वेळ वाया जातो़ तसेच चार ते पाच किलोमीटर अंतर असल्याने पैसाही खर्च होतो. त्यामुळे येथे बँक आवश्यक आहे.
- धनसिंग राठोड, व्यापारी, गणेशनगर

बोपखेल व गणेशनगर भागात बँक नसल्याने येथील नागरिकांना शासकीय योजनांचा फायदा घेता येत नाही. त्यासाठी आम्ही काही बँकांना निवेदन दिले आहे. विविध बँकांच्या मुख्य शाखांमध्ये जाऊन बोपखेलमध्ये बँक सुरू व्हावी, अशी विनंती करत आहोत. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरीवस्ती असलेल्या भागात बँक सुरू करण्यात यावी, असे आवाहन समस्त बोपखेलकरांच्या वतीने मी करत आहे.
- संतोष घुले, बोपखेल  

......................................

 रामनगर भागात अनेक महिला बचत गट आहेत. या बचत गटातील महिलांना भरणा भरण्यासाठी दापोडी येथील बँकेत जावे लागते. सीएमईने रस्ता बंद केल्याने वळसा घालून जावे लागते. त्यामुळे वेळ व येण्याजाण्याचा मोठा खर्च होतो.
- प्रवीण शिंदे, रामनगर
........................... 
 बोपखेल व गणेशनगर भागात अनेक आर्मीमधील निवृत्त अधिकारी व नोकर वर्ग राहतो आहे. निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन आणण्यासाठी विश्रांतवाडी किंवा दिघी येथील बँकेमध्ये जावे लागते. ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. बोपखेल भागातच बँक सुरू करण्यात आली तर ज्येष्ठ नागरिकांना आपल्या भागातच पेन्शन मिळेल व प्रवास टळेल.
- रंगनाथ घुले, गणेशनगर

Web Title: Excellent sample of surprises ...! There is no branch of Bank in this village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.