एक्साईजवाल्यांची सटकली, आता गांजावाल्यांची बारी
By नारायण बडगुजर | Published: September 13, 2023 07:33 PM2023-09-13T19:33:09+5:302023-09-13T19:33:58+5:30
काळेवाडीत दोन लाख १८ हजारांचा २२ किलो गांजा जप्त
पिंपरी: राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साइज) आता गांजा विक्री व साठा करणाऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात काळेवाडी येथे सोमवारी (दि. ११) रात्री कारवाई करून दोन लाख १८ हजार २१० रुपयांचा २१ किलो ८२१ ग्रॅम गांजा जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्कचे पुणे जिल्ह्याचे अधीक्षक चरणजितसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथे बीआरटी मार्गालगत विनावापर असलेल्या खोलीमध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक्साइजच्या पथकाने सोमवारी (दि. ११) कारवाई केली. यात हिरव्या रंगाची अर्धवट वाळलेले गांजाची पान व फुले व बोंडे असलेला एकूण २१ किलो ८२१ ग्रॅम वजनाचा दोन लाख १८ हजार २१० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम २०(ब) अन्वये गुन्हा दाखल केला.
एक्साइजचे अधीक्षक चरणजितसिंग राजपूत, पिंपरी-चिंचवडचे उपअधीक्षक युवराज शिंदे, निरीक्षक सुनील परळे, दीपक सुपे, विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक नारायण मुंजाळ, प्रकाश सेतसंदी, अजित बडदे, आशिष जाधव, प्रवीण देशमुख, भरारी पथकाचे बाबुराव घुगे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक स्वप्नील दरेकर, जवान एम. कदम, नारायण जाधव, महेंद्र कदम, अतुल बारंगुळे, रोहिदास गायकवाड, अशोक आदमनकर, जयराम काचरा, शरद हांडगर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
गांजावाले गडबडले...
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात हातभट्टी दारू तसेच अवैध दारू विक्री विरोधात मोठी कारवाई सुरू आहे. त्यामुळे या अवैध धंद्यावाल्यांनी एक्साइजचा धसका घेतला आहे. दरम्यान, एक्साइजच्या पथकाने काळेवाडी येथे अचानक कारवाई करून गांजा जप्त केला. या कारवाईची मोठी चर्चा झाली. जिल्ह्यातील गांजा साठा करणारे, विक्री करणारे तसेच या धंद्यात असलेल्यांना या कारवाईतून इशारा देण्यात आला असून गांजावाले गडबडले आहेत.
एक्साईजकडून यापुढे गांजा विरुद्ध नियमित कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे गांजाबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी एक्साइजच्या १८००२३३९९९९ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्यानुसार कारवाई करण्यात येईल.
- चरणजितसिंग राजपूत, अधीक्षक, एक्साइज, पुणे