Pimpri Chinchwad: 'एक्साईज'चा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दणका; गोव्याहून आणलेले एक कोटीचे मद्य जप्त
By नारायण बडगुजर | Published: January 2, 2024 09:32 AM2024-01-02T09:32:10+5:302024-01-02T09:32:32+5:30
खेड शिवापूर टोल नाक्यावर सोमवारी (दि. १) रात्री ही कारवाई करण्यात आली....
पिंपरी : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्साईज) पुणे विभागाने अवैध दारूवाल्यांना दणका दिला. संशयित वाहनांची तपासणी करत असताना बेकायदेशीर विक्रीसाठी अवैध वाहतूक होत असलेले गोवा राज्यातील मद्य जप्त करण्यात आले. कंटेनर ट्रकसह एक कोटीचा मुद्देमाल जप्त केला. खेड शिवापूर टोल नाक्यावर सोमवारी (दि. १) रात्री ही कारवाई करण्यात आली.
नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. यात शौकिनांनी कोट्यवधी रुपयांचे मद्य रिचवले. त्यामुळे दारूची बेकायदेशीर विक्रीसाठी वाहतूक होण्याची शक्यता असल्याने एक्साईजकडून भरारी पथके व विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.
एक्साईजकडून खेड शिवापूर टोल नाक्यावर सोमवारी वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी वाहनचालकांकडे वाहनांमध्ये काय आहे, चौकशी करण्यात येत होती. त्यावेळी एक कंटेनर थांबवून चालकाकडे चौकशी केली असता चालकाने दिलेल्या उत्तरावरून संशय आला. त्यामुळे कंटेनरची तपासणी केली. कंटेनरचा दरवाजा उघडला असता रंगाचे डबे ठेवल्याचे दिसून आले. कंटेनरमध्ये डब्यांच्या मागे मद्याच्या बाटल्यांचे एक हजार बॉक्स मिळून आले. हे मद्य फक्त गोवा राज्यात विक्री करण्यासाठी असताना त्याची महाराष्ट्रात बेकायदेशीर विक्रीसाठी वाहतूक करण्यात आली. कंटेनर चालकाकडे मद्य वाहतुकीच्या संदर्भातील कोणताही वाहतूक पास, परवाना अगर कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत.
कंटेनर आणि गोवा येथे विक्रीसाठी असलेल्या या मद्याची किंमत एक कोटी असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून कंटेनरसह मद्य जप्त करण्यात आले आहे. तसेच कंटेनर चालकासह दोघांना अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनील चव्हाण यांच्या आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक संजय पाटील, युवराज शिंदे, एस. बी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.