Pimpri Chinchwad: एक्साइजचा हातभट्टीवर छापा; महिन्याभरात २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
By नारायण बडगुजर | Published: October 30, 2023 04:19 PM2023-10-30T16:19:29+5:302023-10-30T16:20:44+5:30
हवेली तालुक्यातील शिंदवणे गावाच्या हद्दीत राठोड वस्तीच्या पूर्वेस ही कारवाई झाली...
पिंपरी : हातभट्टीवर छापा घालून गावठी दारूचे रसायन नष्ट करण्यात आले. यात एक लाख १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुणे येथील राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्साइज) जी विभाग व विशेष भरारी पथक यांनी ही संयुक्त कारवाई केली. हवेली तालुक्यातील शिंदवणे गावाच्या हद्दीत राठोड वस्तीच्या पूर्वेस ही कारवाई झाली.
एक्साइजच्या जी विभागाचे निरीक्षक संजय कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदवणे गावचे हद्दीत राठोड वस्तीचे पूर्वेस गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक्साइजच्या संयुक्त पथकाने छापा घालून कारवाई केली. यामध्ये पाच हजार लिटर रसायन, २८० लिटर हातभट्टीची गावठी दारू व इतर साहित्य असा एक लाख १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हातभट्टी निर्मिती करणाऱ्या इसमांविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद केला.
एक्साइजचे पुणे येथील अधीक्षक चरणजितसिंग रजपूत, उपअधीक्षक एस. आर. पाटील, युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय कोल्हे, दुय्यम निरीक्षक के. एस. ढावरे, आर. आर. वाघ, जवान अमोल कांबळे, संतोष गायकवाड, दत्तात्रय अबनावे, प्रिया चंदनशिवे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
महिन्याभरात २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
एक्साइजच्या जी विभागाने १ ते ३० ऑक्टोबर या महिन्याभरात धडाकेबाज कारवाई केली. यात ४६ गुन्हे नोंदवून २७ आरोपींना अटक केली. गावठी दारू १९८५ लिटर, रसायन ४३४५० लिटर, ताडी ९२० लिटर, देशी दारू ९.१९ ब. लि., विदेशी मद्य १७.७३ ब. लि. यासह आठ वाहने, ३६४५ किलोग्रॅम काळा गुळ असा एकूण २२ लाख १८ हजार ३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.