उद्योगनगरीत आषाढी एकादशीचा उत्साह

By admin | Published: July 5, 2017 03:16 AM2017-07-05T03:16:44+5:302017-07-05T03:16:44+5:30

वारकरी संप्रदायाचा एक प्रधान आराध्य दैवत म्हणून विठ्ठलाला-पांडुरंगाला अधिष्ठान आहे. महाराष्ट्र व कर्नाटकात प्राचीन काळापासून विठ्ठलाला

The excitement of Ashadhi Ekadashi in the industry | उद्योगनगरीत आषाढी एकादशीचा उत्साह

उद्योगनगरीत आषाढी एकादशीचा उत्साह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वारकरी संप्रदायाचा एक प्रधान आराध्य दैवत म्हणून विठ्ठलाला-पांडुरंगाला अधिष्ठान आहे. महाराष्ट्र व कर्नाटकात प्राचीन काळापासून विठ्ठलाला उपास्य दैवत म्हणून पुजले जाते. भारतीय भक्तिसंप्रदायांपैकी वैष्णव संप्रदायी विठ्ठलाला मनोभावे पुजतात. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम असे अनेक संतश्रेष्ठ या पंथात होऊन गेले. आजमितिलाही लाखो वैष्णव संप्रदायी आहेत. ते दर वर्षी आषाढी, कार्तिकी, माघी वा चैत्री यांपैकी एका शुद्ध एकादशीला गळ्यात तुळशीची माळ घालून नियमाने पंढरपुरास विठ्ठलाचे दर्शन घ्यायला जातात. पंढरपूरला महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण आणि तस्वरूपी असलेल्या विठ्ठलाची भक्ती असलेले हे वारकरी एकादशी व्रत निष्ठेने करतात. पिंपरी-चिंचवड शहरात आज एकादशीचा उत्साह पहायला मिळाला.


थेरगावात प्रसन्न वातावरण
थेरगाव : गुजरनगर येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मंगळवारी पहाटे विधीवत पूजा व अभिषेक करण्यात आला. भाविकांचा भरपावसात शिगेला पोहचलेला उत्साह अन् हरिनामाच्या गजरात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. थेरगावमध्ये अनेक ठिकाणी भजन, कीर्तनाचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली होती. जवळपास हजारो भाविकांनी दर्शन घेतले. आषाढी
एकादशीनिमित्त शहर भक्तिमय वातावरणात दुमदुमले होते. महापूजा, भजन, कीर्तन आणि हरिगजरात भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले. परिसरातील
काही मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. त्यामुळे आषाढी एकादशीचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसला. ठिकठिकाणी काही मंदिरात आषाढीनिमित्त भजनाचा आणि फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अभिनव शाळेत दिंडी
जाधववाडी : येथील अभिनव प्राथमिक व माध्यमिक शाळेत वृक्ष, ग्रंथ व जलदिंडीचे आयोजन करण्यात आले. पालखी शाळेपासून सावता माळी मंदिर, महादेव मंदिर परिसरात विठूनामाच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत संतांच्या प्रतिरूपात चिमुकले टाळ-मृदंग-वीणा वाजवीत भक्तिमय वातावरणात रंगले होते. या पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक परमेश्वर शिंदे व माध्यमिक विभागाचे राजेंद्र पवार यांनी केले. याकरिता सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालकवर्गाचा मोठा सहभाग होता. या प्रसंगी शाळेचे संस्थापक किरण मोरे, नगरसेविका अश्विनी जाधव, नगरसेवक राहुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप करून सोहळ्याचा समारोप झाला.
निगडीत महाभिषेक व महापूजा
निगडी : येथील श्री संत तुकाराम प्रतिष्ठानातर्फे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले. सकाळी आठला श्रींच्या मूर्तीस महाअभिषेक व महापूजा नगरसेविकाशर्मिला बाबर व राजेंद्र बाबर यंच्या शुभहस्ते करण्यात आली. दुपारी चारला संत तुकाराम भजनी मंडळाचा भजन व कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. सायंकाळी सहाला हभप दीपकबुवा रास्ते यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. रात्री आठला उपमहापौर शैलजा मोरे व भाजपा सरचिटणीस अनुप मोरे यांच्या हस्ते श्रींची महाआरती झाली. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
आकुर्डीतील मंदिरात कीर्तन
निगडी : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असलेले आकुर्डीतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हभप अनंतमहाराज मोरे यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. या वेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. सकाळी श्रींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. सकाळी १० ते १ या वेळेत हभप अंकुशमहाराज गाडगे यांचे एकपात्री एकनाथी भारुड ठेवण्यात आले. दर्शनासाठी शहरातील भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येत गर्दी केली होती.

कुदळवाडीत फराळवाटप
जाधववाडी : कुदळवाडी येथील महेशदादा लांडगे युवा मंच व वै. वामनमहाराज यादव सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने सालाबादप्रमाणे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फराळवाटप झाले. या वेळी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या प्रसंगी कामगार नेते हनुमंत लांडगे, युवराज पवार, सरपंच तुकाराम बढे, विजयराज यादव, मनोज मोरे, रोहित जगताप, किशोर लोंढे, नंदीप खरात,अमित बालघरे, विशाल उमाप, काका शेळके, दीपक घन, यश जाधव, आकाश सांळुके, स्वप्निल पोटघन, प्रसाद मायभट्टे, सचिन डिबंर, कौस्तुभ यादव, राजेश गायकवाड, विक्रम नेवाळे, वैभव वाघ, अक्षय पवार हे उपस्थित होते. दिनेश यादव यांनी आयोजन केले.
सांगवीत भक्ति मय वातावरण
सांगवी : परिसरातील विठ्ठल मंदिरात भाविकांची सकाळपासूनच गर्दी होती. सांगवी गावठाणातील विठ्ठल मंदिरात आज सकाळी महापूजा होऊन मंदिरात भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या वेळी परिसरातील माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्याकडून मंदिरात प्रसाद देण्यात आला.जुनी सांगवीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर साठ वर्ष जुने असून याचे विश्वस्थ खानू कृष्णाजी ढोरे हे मंदिराची व्यवस्था बघतात. मंदिराची देखभाल भक्तांच्या देणगीवर केली जाते. परिसरातील भक्त मोठ्या मनाने मंदिराची देखभाल करतात. नव्या संगवीतील काटे चौक परिसरातील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी होती. परिसरात भक्तिमय वातावरण दिसून आले.
चिखलीत दिंडी सोहळा उत्साहात
पिंपरी : सोनवणेवस्ती, चिखली येथील विश्वकल्याण इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये पर्यावरण दिंडी काढण्यात आली. वारीची परंपरा काय, दिंडीविषयक मुलांना माहिती व्हावी या हेतूने चिखली परिसरातून पर्यावरणाचा संदेश दिला. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पताका खांद्यावर घेतले होते. मुखी हरिनामाचा गजर केला. वारकऱ्यांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी हातात पर्यावरणाचा संदेश देणारे फलक घेतले होते. वृक्षसंवर्धन, स्वच्छता, वीजबचत, ध्वनिप्रदूषण, हवा प्रदूषण, एक मूल दोन झाडे अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या वेळी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी डॉ. जितेंद्र मेहता, नीलम मेहता, रितू गुळवाणी, मुख्याध्यापिका कल्पना साळुंके, दीपाली करंदीकर आदी उपस्थित होते.
पूर्णानगरमध्ये ‘बेटी बचाओ’चा नारा
निगडी : पूर्णानगर येथील किड्स पॅराडाईज प्री प्रायमरी स्कूलतर्फे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या पालखी सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्या सारिका पवार यांचे मोठे सहकार्य लाभले. या पालखी सोहळ्यात बेटी बचाव व पर्यावरण यावर संदेश देण्यात पालखीचे नियोजन करण्यात आले. या पालखीमध्ये परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या पालखीमध्ये किड्स पॅराडाईज प्री-स्कूलच्या संचालिका स्वाती गिरगुणे, सामाजिक कार्यकर्ते सारिका पवार, रचना नगरकर, पल्लवी डेरे, प्रतीक्षा जोशी, स्नेहल वारके व प्रेरणा महाले, कविता गौर, भूषण भांगे आदी सहभागी होते.

वसंतदादा विद्यालयात वृक्षदिंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नेहरूनगर : पाणी वाचवा, पाणी जिरवा... झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छ भारत, सुंदर भारत असा पर्यावरणविषयी सामाजिक संदेश देत आणि विठ्ठल-विठ्ठल, ग्यानबा तुकारामचा जयघोष करीत टाळ-मृदंगाच्या गजरात वसंतदादा पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेहरूनगर परिसरातून वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण केले.
या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वृक्षदिंडी वसंतदादा पाटील विद्यालयापासून काढण्यात आली. विद्यार्थी विठ्ठल-रुक्मिणी व वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करून कीर्तन केले. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. दिंडी नेहरु चौकामार्गे ईदगाह मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिंडीची सांगता झाली.
वृक्षदिंडीत माजी महापौर हनुमंत भोसले, नगरसेवक राहुल भोसले, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे, साई द्वारकामाई सेवा मंदिराचे अध्यक्ष सतीश भोसले, ज्ञानेश्वर इंगळे, ज्ञानेश्वर मोहिते, अनिल यादव, तिम्मा टाकळे, मुख्याध्यापिका सुनीता काळे, पर्यवेक्षिका नेहा वीरकर, शिक्षिका संध्या वाळुंज, सविता महांगडे सहभागी होते.

स्टार किड्स स्कूलमध्ये वेशभूषा

लोकमत न्यूज नेटवर्क
तळवडे : आषाढी एकादशीनिमित्त तळवडे येथील ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीच्या स्टार किड्स प्री-स्कूलचा अभिनव पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला. दिंडीमध्ये स्कूलचे छोटे-छोटे वारकरी विठ्ठल-रखुमाई, ज्ञानेश्वरमहाराज, तुकाराममहाराज, मुक्ताबाई अशा विविध संतांच्या वेशभूषा केलेले वारकरी ज्ञानोबा-तुकारामचा गजर करीत सहभागी झाले होते.
या वेळी नगरसेवक प्रवीण भालेकर, अंकुशमहाराज नखाते, कैलास भालेकर, बेबीताई भालेकर आणि सुशीला भालेकर यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर दिंडीसोहळा तळवडे येथील भैरवनाथ मंदिरामार्गे ग्रामप्रदक्षिणा करीत हनुमान मंदिर परिसरात पोहोचला. दरम्यान, पालखी मार्गावर ग्रामस्थांनी मनोभावे पालखीचे स्वागत केले. हनुमान चौकात रिंगण घेण्यात आले. या वेळी उपस्थित पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळत आनंद साजरा केला. विद्यार्थ्यांनी दिंडीमध्ये झाडे लावा, झाडे जगवा, मुलगी वाचवा, मुलींना शिकवा, स्वच्छता हाच आरोग्याचा महामंत्र आहे, असे समाजप्रबोधन करणारे फलक घेत जनजागृती केली. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षकांनी केले.

Web Title: The excitement of Ashadhi Ekadashi in the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.