Dr Babasaheb Ambedkar: बेटा, काशीबाई काय बेत केलाय आमच्यासाठी? बाबासाहेबांसाठी भाजी-भाकरी बनविणा-या ९३ वर्षीय काशीबाईंची खास मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 01:52 PM2022-04-14T13:52:26+5:302022-04-14T13:52:36+5:30

बाबासाहेबांना आवडणाऱ्या भाज्या व भाकरीचे रुचकर जेवण त्यांच्यासाठी बनवायची. त्यांना पोटभर खाऊ घालण्यात माझी धन्यता

Exclusive Interview with 93 years old Kashibai gaikwad related to Dr Babasaheb Ambedkar | Dr Babasaheb Ambedkar: बेटा, काशीबाई काय बेत केलाय आमच्यासाठी? बाबासाहेबांसाठी भाजी-भाकरी बनविणा-या ९३ वर्षीय काशीबाईंची खास मुलाखत

Dr Babasaheb Ambedkar: बेटा, काशीबाई काय बेत केलाय आमच्यासाठी? बाबासाहेबांसाठी भाजी-भाकरी बनविणा-या ९३ वर्षीय काशीबाईंची खास मुलाखत

googlenewsNext

पिंपरी : मला आजही ते दिवस आठवतात. भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर तळेगावातील या बंगल्यात शिरताच मला आवाज देत. ‘‘बेटा काशीबाई, आज काय बेत केलाय आमच्यासाठी!’’ आवाज कानी पडताच मी आधीच तयार केलेले आरतीचे ताट, निरंजन घेऊन सायोरी जायची, बाबासाहेबांना ओवाळायची. पाया पडून आशीर्वाद घेऊन स्वयंपाकाच्या कामाला सुरुवात करायची. बाबासाहेबांना आवडणाऱ्या भाज्या व भाकरीचे रुचकर जेवण त्यांच्यासाठी बनवायची. त्यांना पोटभर खाऊ घालण्यात मला धन्यता वाटायची अशा आठवणी काशीबाई गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितल्या आहेत. 
 
बाबासाहेबांच्या आठवणी कायम हृदयात जपून ठेवल्या

केवळ बाबासाहेबांच्या सेवेतच नाही, तर त्यांच्या परिवर्तनाच्या लढ्यातील एक अनुयायी मी होते. सासरे लिंबाजी अमृतराव गायकवाड मावळातल्या धामण्याचे सधन शेतकरी आणि बड़े कंत्राटदारही होते. बाबासाहेबांनी तळेगावची जागा त्यांच्या अथक परिश्रमाने मिळाली होती. बाबासाहेब तळेगावच्या वास्तूत एकूण ४८ वेळा आले. क्वचित मुक्कामीही थांबले. त्यांची सेवाशुश्रूषा करण्याचं काम आमचे कारभारी दत्तोबा गायकवाडांचे कुटुंब मोठ्या आत्मीयतेने करायचे. आमचे कारभारी आज हयात नाहीत; पण बाबासाहेबांच्या व गायकवाड यांच्या आठवणी कायम हृदयात जपून ठेवल्या आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

कधी सांगावा धाडून बोंबलाची चटणीही करायला लावीत

“बाबासाहेब तळेगावात येणार असल्याची माहिती आदल्या दिवशी तहसील कचेरीतून मिळताच, आम्ही दोघेही सकाळपासून कामाला लागायचो. त्यांनी वाण्याकडून टपकळ बाजरी आणावी. ती निवडून माहेरच्या एखाद्या आई-बाईला बोलावून जात्यावर दळावी. बाबासाहेबांना जात्यावर दळलेली आणि हातावर थापलेली, चुल्हागणावर गरम गरम खरपूस भाकरी बेहद्द आवडायची. शिवाय बाबासाहेब आवडीने भात खायचे तो आंबेमोहर. हा आंबेमोहर धामण्याच्या शेतातलाच असायचा. भाजीचे म्हणाल, तर बाबांना मेथीची भाजी खूप आवडायची. मुगाच्या डाळीचे वरण, कधी शेंगदाणा, तिळाची चटणी तर कधी कधी जवसाची. एवढ्या जेवणावरही ते खुश होत; पण कधी सांगावा धाडून बोंबलाची चटणीही करायला लावीत. चुलीच्या हारात भाजलेल्या कांडक्या, पात्याचा कांदा, मसाल्यात डवचून तव्यात उलथापालथ करून दिलेली चटणी बाबांनी मागून मागून खावी आणि मी प्रेमाने वाढत राहावी. हातावरच्या दोन भाकऱ्या खाऊन ते तृप्त झाल्याचे पाहून आनंद वाटायचा. येथील बंगल्यात त्यांच्या येण्याने मावळची ही भूमी पावन झाली आहे.

आठवणींसह जपून ठेवले पितळेचे ताट, वाटीही...

१९५४ मध्ये दत्तोबा गायकवाड यांची बदली पंजाबमध्ये सीओडी डेपोत झाली. सात-आठ वर्षे बाबासाहेबांशी एकरूप झालेल्या या कुटुंबीयाचे ऋणानुबंध तुटले. बंगला सोडून जाताना झालेले दु:ख काशीमाईंच्या चेहऱ्यावर उमटताना दिसले. ना पुढे त्यांना बाबासाहेबांना भेटण्याचा योग आला, ना त्यांची सेवा करता आली. मात्र, बाबासाहेब कुठे बसले, कोणत्या भांड्यात जेवले ती पितळेची ताट, वाटी, पातेली, तांब्या, ग्लास आणि वगराळ अशी सारी भांडी काशीबाईंनी जीवापाड आजही जपली आहेत. आणि त्या आजही सर्वांना आस्थेने दाखवतात, अशी माहिती काशीबाईंचे पुत्र बृहस्पती गायकवाड यांनी दिली.

''बाबासाहेबांचे अन् आमचे दोन पिढ्या संबंध होते. आजोबा सरकारी कंत्राटदार होते. त्यांच्या कामाचे केलेल्या कौतुकांची पत्रे आजही आम्ही जपून ठेवली आहेत. बाबासाहेबांनी तळेगावमध्ये घेतलेल्या जागेची देखभालीचे कामही आमच्याकडे होेते. वडीलही सामाजिक कार्यात असल्याने बाबासाहेब जवळून ओळखत. माझा जन्मही बाबासाहेबांच्या तळेगावातील याच वास्तूत झाला. त्यामुळे या वास्तूशी आमचे दोन पिढ्यांचे ऋणानुबंध आजही कायम आहेत असेही बृहस्पती गायकवाड यांनी सांगितले.'' 

शब्दांकन : ज्ञानेश्वर भंडारे

Web Title: Exclusive Interview with 93 years old Kashibai gaikwad related to Dr Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.