सत्तेची गणिते जुळविण्यासाठी कसरत
By admin | Published: August 8, 2015 12:34 AM2015-08-08T00:34:14+5:302015-08-08T00:34:14+5:30
मावळ तालुक्यात ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. आॅगस्टअखेर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका होणार असल्याने
महादेव वाघमारे, वडगाव मावळ
मावळ तालुक्यात ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. आॅगस्टअखेर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका होणार असल्याने ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाची सत्ता आणण्यासाठी पक्षाचे राजकीय नेते ग्रामपंचायतीमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी सदस्यांचे गणित जुळविण्यासाठी कसरत करत आहेत.
निवडणुका गावकी व भावकीच्या जोरावर स्थानिक पॅनलच्या वतीने निवडणुका लढविल्या गेल्या. यात कोणत्याही उमेदवाराने राजकीय पक्षाच्या चिन्हावर ग्रामपंचायत निवडणुका लढविल्या नाही. तरी, पक्षाचे राजकीय नेते मावळ तालुक्यात आमच्या पक्षाचे उमेदवार सर्वाधिक निवडून आले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुका भवितव्य ग्रामपंचायतीवरील वर्चस्वावर असते.
ग्रामपंचायतीवर सत्ता कायम राहण्यासाठी आजी-माजी सदस्यांनी आरक्षण जागेचा विचार करता त्यांच्याच घरातील उमेदवार निवडून आणले आहे. केवळ सरपंच व उपसरपंचपद मिळविण्यासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी माजी सदस्य व राजकीय नेते प्रत्येक सदस्याला पदाचे व पैशाचे आमिष दाखवून पाठिंबा मिळवत आहेत. काही ग्रामपंचायतींत सत्ता काबीज करण्यासाठी एकाच सदस्याची आवश्यकता आहे. अशा ग्रामपंचायतींच्या सदस्याला पद व मोठ्या रकमेचे आमिष दिले जात आहे. काही राजकीय नेत्यांनी अशा महत्त्वाच्या सदस्याला काबीज करून त्यांना अनाथ स्थळी ठेवल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या अगोदर २४ तास मोबाईल चालू ठेवणारे व मतदाराला सतत दर्शन देणाऱ्या उमेदवारांचे मतमोजणीनंतर फोन बंद असून, त्यांचा शोध मतदार घेत आहे.
कुणबीच्या दाखल्याने ओबीसी जागांवर आजी-माजी सदस्यांच्या महिला व मुलांची बाजी असून, ५० टक्के महिलाराज व तरुणाईचा सहभाग वाढल्याने ग्रामपंचायती निवडणुकीत चैतन्य आल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी घराणेशाही सुरू असल्याचे दिसत आहे.
निवडणुकीत आश्वासन देणारे विजयी उमेदवार निवडणूक संपल्यावर ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. बहुमताचे गणित जुळविताना विजयी सदस्य मिळत नसल्याने त्या सदस्यांच्या नातेवाइकाच्या घरी राजकीय नेते चकरा मारत असून, तेथे नसल्याचे समजल्यास राजकीय नेते निराश होत आहेत. सत्ता आमची असल्याचा दावा करणाऱ्या काही नेत्यांच्या हातून सत्ता बहुमताचे गणित न जुळल्याने हातून निसटत आहेत. सरपंच व उपसरपंच निवडणुकीपर्यंत विजयी सदस्यांची मनधरणी करताना नेत्यांना कसरत करावी लागत आहे.
विजयी सदस्याचा काही तास फोन बंद असल्यास नेते त्याच्या घरी पोहोचत आहेत. त्यास कोणी आमिष दाखवून परिवर्तन करणार नाही, यासाठी पाहिजे ती मदत करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.