चांगले सरकार यावे ही अपेक्षा अन् पिंपरीत निम्मे मतदार मतदानच करत नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 05:58 PM2024-11-08T17:58:48+5:302024-11-08T18:00:11+5:30
पिंपरी चिंचवडमधील ३ मतदारसंघातील आतापर्यंतची टक्केवारी पाहिल्यास हा आकडा ६१ टक्क्यांच्या पुढे पोहोचू शकला नाही
पिंपरी : राज्याची सूत्रे कोणाच्या हाती द्यायची हे ठरविण्यासाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. शहरातील तीनही मतदारसंघातील उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता प्रतीक्षा मतदान आणि मतमोजणीच्या दिवसाची आहे. चांगले सरकार यावे, समस्या सोडविणारा आणि सुविधा देणारा लोकप्रतिनिधी मिळावा, अशी प्रत्येक मतदाराची अपेक्षा असते, परंतु यासाठी आवश्यक मतदानाबाबत मात्र मतदार उदासीन असल्याचे दिसून येत आहे. शहरातील तीन मतदारसंघातील आतापर्यंतची मतदानाची टक्केवारी पाहिल्यास हा आकडा आजपर्यंत कधीच ६१ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकला नाही.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तीन विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत अस्तित्वात आले. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांमधील आकडेवारी पाहिल्यास सर्वाधिक मतदान २०१४ मध्ये भोसरी मतदारसंघात ६०.९२ टक्के झाले होते. याव्यतिरिक्त कधीही मतदानाची टक्केवारी ६० टक्क्यांपर्यंत पोहचू शकली नाही.
पिंपरीत सरासरी ५० टक्केच..
शहरातील सर्वांत लहान मतदारसंघ पिंपरी आहे, पिंपरीतील मतदानाची आकडेवारी सर्वांत कमी आहे. या मतदारसंघात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५०.२१ टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले होते. याचाच अर्थ, या मतदारसंघातील निम्मे मतदार मतदानाचा अधिकार बजावत नाहीत. ही टक्केवारी वाढणे खूप गरजेचे आहे, परंतु समाधानाची बाब अशी की प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे.
चिंचवडमध्ये ५६ टक्केच..
चिंचवड हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या पुढे असते. या मतदारसंघात २०१४ साली सर्वाधिक ५६.३० टक्के इतके मतदान झाले होते. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर २०२३ साली झालेल्या पोटनिवडणुकीतही या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आसपास होती. या मतदारसंघात मोठ्या वेगाने मतदारसंख्या वाढत असताना मतदानाची टक्केवारी मात्र वाढताना दिसत नाही.
भोसरीत ६० टक्क्यांपर्यंत...
भोसरी मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये मतदारांमध्ये काहीशी जागृती आल्याचे दिसून येत आहे. २००९ मध्ये या मतदारसंघात केवळ ४८.१७ टक्के मतदान झाले होते. २०१४ शहरातील आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान ६०.९२ टक्के या मतदारसंघात नोंदविले गेले. २०१९ मध्ये हा आकडा किंचित घसरून ५९.७१ टक्क्यांवर आला.
मावळातील मतदार अधिक सजग
शहराला जोडून असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघाचा बहुतेक भाग ग्रामीण आहे. बराचसा परिसर डोंगर-दऱ्यांचा दुर्गम असा आहे तरीही शहरातील मतदारसंघाच्या तुलनेत मावळमधील मतदार अधिक सजग असल्याचे दिसून येत आहेत. या मतदारसंघात सर्वांत कमी मतदान २००९ मध्ये झाले होते. तेही ६५.४१ टक्के इतके होते. या आकड्यापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील एकही मतदार संघ पोहोचू शकले नाही. मावळ मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये ७१ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे.
विधानसभा निवडणुकीतील मतदान
मतदारसंघ : २००९ - २०१४- २०१९
चिंचवड : ५०.५३ - ५६.३० - ५३.६६
पिंपरी : ४५.२२ - ४६.२३ - ५०.२१
भोसरी : ४८.१७ - ६०.८६ - ५९.७१
मावळ : ६५.४१ - ७१.११ - ७१.२१