मिळकत विभागाची जप्तीची मोहीम
By admin | Published: March 23, 2017 04:28 AM2017-03-23T04:28:21+5:302017-03-23T04:28:21+5:30
महापालिका निवडणुकीनंतर करबुडव्यांविरोधात महापालिकेने जप्तीची मोहीम सुरू केली आहे. मिळकतकर थकविणाऱ्या एका मॉल
पिंपरी : महापालिका निवडणुकीनंतर करबुडव्यांविरोधात महापालिकेने जप्तीची मोहीम सुरू केली आहे. मिळकतकर थकविणाऱ्या एका मॉल आणि सात गोदामांवर कारवाई केली. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी एक कोटी ४० लाखांची थकबाकी एका दिवसात भरली.
महापालिकेने मार्चअखेर थकबाकी असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दहा हजारांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या ६५ हजार नागरिकांना नोटीस बजावली आहे. तसेच ४२ हजार ३४५ जणांना जप्तीपूर्वीची नोटीस बजावली आहे. आजअखेर करसंकलन विभागाकडे चार लाख पन्नास हजार मिळकतींची नोंद झाली आहे. त्यांपैकी ३ लाख मिळकतधारकांनी ३६६ कोटींची थकबाकी भरली आहे.
महापालिकेच्या करसंकलन विभागाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. मिळकतकर विभागाने सांगवी जवळकरनगरमधील मोर मॉल आणि ताथवडेमधील ७ गोदामांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक गेले असता, संबंधितांनी ९९ लाख, ४० लाखांचा कर भरला आहे. सुटीच्या दिवशीही कर भरण्याची सुविधा महापालिकेच्या १६ कार्यालयांत केली आहे, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.(प्रतिनिधी)