फटाक्यांच्या दारूचा स्फोट; भिंती हादरल्या, बायका होरपळल्या, शरीराचा अक्षरश: कोळसा झाला...!

By नारायण बडगुजर | Published: December 8, 2023 11:36 PM2023-12-08T23:36:31+5:302023-12-08T23:37:50+5:30

इतरांच्या वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ व्हावे म्हणून केकसाठी शोभेचा फटाका तयार करणाऱ्या सहा महिलांचा अक्षरश: कोळसा झाला.

explosion in firecracker factory The walls shook the women screamed the body was literally charred | फटाक्यांच्या दारूचा स्फोट; भिंती हादरल्या, बायका होरपळल्या, शरीराचा अक्षरश: कोळसा झाला...!

फटाक्यांच्या दारूचा स्फोट; भिंती हादरल्या, बायका होरपळल्या, शरीराचा अक्षरश: कोळसा झाला...!

पिंपरी : तळवडे येथील फटाक्यांच्या (फायर क्रॅकर) अनधिकृत कारखान्यात शुक्रवारी दुपारी स्फोट झाला आणि होत्याचे नव्हते झाले. या स्फोटाने कारखान्याच्या भिंती हादरल्या आणि महिला मजूर होरपळल्या. इतरांच्या वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ व्हावे म्हणून केकसाठी शोभेचा फटाका तयार करणाऱ्या सहा महिलांचा अक्षरश: कोळसा झाला.

तळवडेतील ज्योतिबानगरात गेल्या काही महिन्यांपासून शोभेच्या फटाक्यांचा कारखाना सुरू होता. या कारखान्यात १५ ते २० महिला मजूर काम करीत. कमी पगारात हे जोखमीचे काम त्यांनी स्वीकारले होते. अग्निशामक दलाकडे आणि महापालिकेकडेही या कारखान्याची नोंद नाही. हा सगळाच कारभार अनधिकृत सुरू होता. पंधरा फूट उंचीच्या चार भिंती आणि त्यावर पत्र्याचे छत असलेल्या शेडमध्ये कारखाना सुरू होता. केवळ एक शटरचा दरवाजा आणि एकच खिडकी असल्याने वायुविजनाची पुरेशी व्यवस्थाही नव्हती. अशा बंदिस्त ठिकाणी फटाक्यांच्या दारूगोळ्याचे काम सुरू होते.

दुपारचे एकत्रित जेवण ठरले अखेरचे
दररोज सकाळी नऊला कारखान्यात काम सुरू व्हायचे. मजूर महिला दुपारच्या जेवणाचे डबे घेऊन येत. शुक्रवारी दुपारी मजूर महिलांनी एकत्र येत गप्पा मारत जेवण केले. त्यानंतर त्यांनी सर्वांचे रिकामे डबे एकाच ठिकाणी ठेवले. जेवण उरकून लगेचच पुन्हा फटाक्यांचे काम सुरू केले. मात्र, त्यानंतर दुर्घटना घडली आणि एकत्र जेवतानाचा आनंदाचा क्षण अखेरचा ठरला. ते डबे काळेठिक्कर पडले होते.

जीव वाचविण्याची धडपड आणि चपलांचा खच
स्फोटानंतर जखमी महिला कारखान्यातून बाहेर पडण्यासाठी जिवाचा आकांत करीत होत्या. मात्र, केवळ एकच दरवाजा आणि तोही अर्धवट उघडा असल्याने बाहेर पडण्यात अडचणी आल्या. सर्वत्र धूर झाल्याने आणि श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत असतानाही जखमी महिला दरवाजाजवळ धडपडत आल्या. तेथे त्यांच्या चपलांचा खच पडला होता.

भिंतींना तडे आणि धूर
स्फोटामुळे हादरे बसून कारखान्याच्या भिंतींना तडे गेले. कारखान्यात मोठ्या प्रमाणात दारूगोळ्याचा धूर झाला. यात कारखान्यातील कपाट, पॅकिंगचे साहित्य, तसेच फटाक्याच्या कांड्याही खाक झाल्या. इलेक्ट्रिक वायरिंगही जळाले. कारखान्याच्या भिंतींसह छताचा पत्रा काळवंडला होता.

बाहेर पडता आले असते तर...
कारखान्याला आणखी दरवाजे असते तर कदाचित मजूर महिलांना लवकर बाहेर पडता आले असते. धूर शेडबाहेर पडून श्वास घेण्यास त्रास झाला नसता. मात्र, एकच दरवाजा आणि एकच खिडकी असल्याने धूर आणि मजूर कारखान्यातच अडकले.
 

Web Title: explosion in firecracker factory The walls shook the women screamed the body was literally charred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.