टास्क फ्रॉडचा पर्दाफाश; आंतरराज्य टोळी जेरबंद, १४ संशयितांना ठोकल्या बेड्या

By नारायण बडगुजर | Published: December 18, 2023 06:42 PM2023-12-18T18:42:32+5:302023-12-18T18:42:49+5:30

पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या युनिट चारची कामगिरी; ऑनलाईन फसवणुकीच्या १७ गुन्ह्यांची उकल

Exposing Task Fraud Interstate gang jailed 14 suspects shackled | टास्क फ्रॉडचा पर्दाफाश; आंतरराज्य टोळी जेरबंद, १४ संशयितांना ठोकल्या बेड्या

टास्क फ्रॉडचा पर्दाफाश; आंतरराज्य टोळी जेरबंद, १४ संशयितांना ठोकल्या बेड्या

पिंपरी : ऑनलाईन टास्क देऊन देशभरातील नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने तांत्रिक विश्लेषण करून ऑनलाईन टास्क फ्रॉडचे १७ गुन्हे उघडकीस आणले. या कारवाईमुळे पहिल्यांदाच ऑनलाईन टास्क फ्रॉडमधील १४ जणांना जेरबंद केले. 

चिंतन शशिकांत फडके (३५, रा. इंदूर, मध्यप्रदेश), आशिष प्रल्हादराय जाजू (३५, रा. कोंढवा, पुणे), ब्रजराज रामरतन वैष्णव (वय १८), अभिषेक सत्यनारायण पाराशर (२४), नवीनकुमार नेवन्दराम आसनाणी (४०), विकास सत्यनारायण पारिख (२९), मनिष ऋषिकेश वैष्णव (३३, पाचही जण रा. भिलवाडा, राजस्थान), मोहम्मद रौफ मोहम्मद रशिद (२४), राजेश भगवानदार करमानी (२६), मोहम्मद रशिद चांद मोहम्मद (४७, तिघेही रा. अजमेर, राजस्थान), सुरेश गोवर्धनदास सिंधी (३२), गौरव महावीर सेन (३१), ललित नवरतन मल पारिख (३३),  सुंदरदास चेदनदास सिंधी (२४, चौघेही रा. गुलाबपुरा, राजस्थान) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
 
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन टास्क फ्रॉडद्वारे एका महिलेची ७१ लाख८२ हजार ५२० रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट चारकडे देण्यात आला. युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शंकर आवताडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक अंबरिष देशमुख, पोलिस उपनिरिक्षक गणेश रायकर यांनी तांत्रिक विश्लेषण केले. यामध्ये संशयितांनी ऑनलाईन फ्रॉडसाठी वेगळीच पद्धत वापरल्याचे समोर आले. संशयितांची गुन्ह्याची पद्धत समाजावून घेत पोलिसांनी संशयितांची ओळख पटविली. त्यानुसार मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये जाऊन १४ संशयितांना जेरबंद केले.

या कारवाईनंतर ऑनालाईन टास्क फ्रॉडचे १७ गुन्हे उघडकीस आले. तसेच हे गुन्हे करण्यासाठी संशयितांनी ९५ बनावट बँक खाते उघल्याचेही समोर आले. हिंजवडी, वाकड, चिंचवड पिंपरी, आळंदी, चिखली, अवधुतवाडी, पूर्व विभाग सायबर पोलिस, दक्षिण विभाग सायबर पोलिस, सायबर क्राईम पोलिस ठाणे, सेंट्रल सायबर पोलिस ठाणे बेंगलोर, सायबर क्राईम पोलिस ठाणे आगरा, सायबर क्राईम पोलिस ठाणे हावडा या पोलिस ठाण्यांमधील गुन्हे उघडकीस आले.

फसवणुकीची पद्धत

संशयितांची टोळी तीन पातळ्यांवर काम करत होती. पहिल्या पातळीवर एखाद्या सर्वसामान्य माणसाला पैशांचे आमिष दाखवून त्याचे आधारकार्ड, फोटो, मोबाईल नंबर, बँक अकाऊंट वापरण्यासाठी घ्यायचे. त्याच्या नावाने शहरात गाळा भाड्याने घेऊन फर्म सुरू करत होते. दुसऱ्या पातळीवर टास्क फ्रॉडसाठी ऑनलाईन ग्राहक शोधत होते. यामध्ये संबंधित नागरिकांना मेसेज करून जास्त उत्पन्नाचे अमिष दाखविण्याचे काम केले जात होते. तिसऱ्या पातळीवर आर्थिक फसवणूक करत पैशांची फेरफार केली जात असे. 

महिलेला आमिष दाखवून फसवणूक

पार्ट टाईम जॉब करून पैसे मिळविण्यासंदर्भात फिर्यादी महिलेला मोबाईलवर मेसेज मिळाला. त्यानंतर संबंधित महिलेला वेगवेगळ्या हॉटेल व रेस्टॉरंटला रिव्हू व रेटिंग देण्याचे काम दिले. त्यासाठी त्यांच्या अकाऊंटवर मोठी रक्कम जमा झाल्याचे सांगितले. महिलेने सुरुवातीला एक दोन वेळा काही रक्कम अकाऊंटवरून काढली. मात्र, नंतर अकाऊंट लॉक झाले आहे, पैसे गुंतवावे लागतील, असे सांगत महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केली.

दोनशे कोटींची फसवणूक

अटक केलेल्या संशयितांनी ९५ बनावट बँक खाते उघडले. या खात्यांमधून दोनशे कोटींचे व्यवहार झाल्याचे उघकीस आले. यामध्ये पिंपरी -चिंचवडमधील फसवणूक झालेल्या नागरिकांची साडेतीन कोटींची रक्कम आहे. ही खाती पोलिसांनी गोठविली आहेत. 

ऑनलाईन टास्क फ्रॉडमध्ये पकडलेले संशयित सुशिक्षीत तसेच सायबर ज्ञान असणारे आहेत. त्यांनी ‘आयटी’ क्षेत्रातील तसेच सुशिक्षीत नागरिकांना लक्ष बनविले. नागरिकांनी ऑनलाईन फसवणुकीबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे. - स्वप्ना गोरे, पोलिस उपायुक्त

Web Title: Exposing Task Fraud Interstate gang jailed 14 suspects shackled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.