पुण्यामध्ये जलजन्य आजारांचा वाढला उद्रेक
By Admin | Published: January 5, 2017 03:04 AM2017-01-05T03:04:23+5:302017-01-05T03:04:23+5:30
गॅस्ट्रो, अतिसार, टायफॉईड (विषमज्वर) आणि कॉलरा (पटकी) या जलजन्य म्हणजेच पाण्यापासून पसरणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून, मागील वर्षात राज्यभरात
पुणे : गॅस्ट्रो, अतिसार, टायफॉईड (विषमज्वर) आणि कॉलरा (पटकी) या जलजन्य म्हणजेच पाण्यापासून पसरणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून, मागील वर्षात राज्यभरात या आजारामुळे ३० जणांचा बळी गेला आहे. जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या एका वर्षात राज्याच्या विविध भागांत एकूण ११६ जणांना लागण झाली होती. त्यातील काही रुग्णांना गंभीर लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यापैकी सर्वाधिक उद्रेक हा ठाणे विभागात झाला असून, ८ जणांचा पाण्यामार्फत होणाऱ्या आजारांनी मृत्यू झाला आहे.
कोणत्याही आजाराचा उद्रेक म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात एखाद्या आजाराचे सर्वसाधारण संख्येपेक्षा अधिक रुग्ण सापडणे. जलजन्य आजारांमध्ये गॅस्ट्रो, अतिसार, टायफाईड आणि कॉलरा यांचा समावेश होतो. राज्यभरात लागण झालेल्या ११६ रुग्णांमध्ये सर्वाधिक उद्रेक अतिसाराचा असून, या रुग्णांची संख्या ५२, गॅस्ट्रो ४४, काविळ ११ आणि कॉलरा ८ इतकी नोंदवण्यात आली आहे. हे सर्व उद्रेक
दूषित पाण्यामुळे झाले असून, त्या ठिकाणी आरोग्य विभागाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत.
जलजन्य आजार हे साठलेल्या पावसाच्या पाण्याने किंवा पिण्याचे पाणी दूषित झाल्याने होतात. ग्रामीण भागात जास्त पाऊस झाल्यामुळे पाणी साचून राहते त्यानंतर त्यामध्ये घाण, कचरा गेल्याने ते दूषित बनते, ग्रामीण भागात तेच पाणी पिण्यासाठी वापरल्याने नागरिकांना बाधा होऊ शकते. तर शहरी भागात पिण्याच्या पाण्यासाठी असणारी पाईपलाईन जुनी झाल्यास किंवा गंजल्यास त्याद्वारे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळते आणि आजारांची लागण होते. याबरोबरच नदी, नाले यांमध्ये अस्वच्छ आणि सांडपाणी सोडल्यामुळेही आजारांचा उद्रेक होण्यास कारणीभूत ठरते.
ठाणे विभागात जलजन्य आजारांचे सर्वाधिक म्हणजे ३२ उद्रेक झाले असून, त्यातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूर विभागात १९ उद्रेक व सात मृत्यू, नाशिक विभागात २० उद्रेक आणि पाच मृत्यू, अकोला विभागात १३ उद्रेक आणि ५ मृत्यू तर पुणे विभागात ३ उद्रेक आणि दोन मृत्यू
झाले आहेत. पुणे विभागातील सोलापूरमध्ये दोन जणांचा मृत्यू हा गॅस्ट्रोने झाल्याची माहिती साथरोग विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. सन २०१५मध्ये याच आजारांची लागण
झालेल्या रुग्णांची संख्या ११८ होती तर केवळ सात जणांचा जलजन्य आजारांनी मृत्यू झाला होता.