Pimpri Chinchwad | टेलिग्रामवर टास्क देऊन एक लाखाला गंडा; चिखलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 01:02 PM2023-05-19T13:02:18+5:302023-05-19T13:05:02+5:30
पैसे भरण्यास सांगून एका व्यक्तीची एक लाख रुपयांची फसवणूक...
पिंपरी : टास्क देऊन ते पूर्ण केल्यानंतर पैसे मिळतील, असे आमिष दाखवले. त्यानंतर पहिल्यांदा काही रक्कम दिली. त्यानंतर पैसे भरण्यास सांगून एका व्यक्तीची एक लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ११ मे रोजी दुपारी जाधववाडी, चिखली येथे घडली.
संदीप आनंदराव पाटील (वय ४०, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि.१७) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार उर्बी पटेल, मोहित बिसवाल, रोषण बिंदवाल, दर्शन फूड प्रॉडक्ट यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्रामवर फिर्यादी यांनी एका महिलेचा आयडी पाहिला. त्यात असलेल्या लिंकवर एक टास्क होता. त्यानुसार फिर्यादींनी लिंकवर जाऊन हॉटेलला लाइक केले. त्यावेळी फिर्यादी यांच्या बँक खात्यात १५० रुपये जमा झाले. आणखी काही टास्कचे फिर्यादीला दोन हजार ८०० रुपये मिळाले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला टास्कद्वारे पैसे कमावण्यासाठी पैसे भरण्यास सांगून फिर्यादीची एक लाख रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक संजय बारवकर तपास करीत आहेत.