पोलिसांनीच उकळली पाच लाखांची खंडणी; गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची विद्यार्थ्याला धमकी
By नारायण बडगुजर | Published: February 15, 2024 06:40 PM2024-02-15T18:40:21+5:302024-02-15T18:40:38+5:30
विद्यार्थ्याच्या चार अन्य महाविद्यालयीन मित्रांनीच देहूरोड पोलिस ठाण्याच्या दोघा कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा कट रचल्याचे उघड झाले
पिंपरी : गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या वडिलांकडून पाच लाखांची खंडणी उकळली. विद्यार्थ्याच्या चार अन्य महाविद्यालयीन मित्रांनीच देहूरोड पोलिस ठाण्याच्या दोघा कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा कट रचल्याचे उघड झाले. अपहरण आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
पोलिस नाईक हेमंत चंद्रकांत गायकवाड आणि पोलिस शिपाई सचिन श्रीमंत शेजाळ, तसेच अनिल रमेश चौधरी (१९, रा. यमुनानगर, वाकड), अमन शेख, हुसेन इलियास डांगे (१९, रा. गहुंजे), मोहम्मद अहमद मिर्झा (१९, रा. आकुर्डी), शंकर केरबा गोरडे (३४, रा. किवळे), मुन्ना स्वामी (रा. रावेत) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी किवळे येथील सिंबायोसिस या महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या वैभवसिंग मनीषकुमार सिंग चौहान (१९, रा. किवळे, पुणे. मूळ रा. झारखंड) या तरुणाने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणात अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे आणि मोहम्मद अहमेर मिर्झा या चौघांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभवसिंग चौहान हा किवळे येथील सिंबायोसिस महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. अर्णव देसाई आणि अनिल चौधरी हे त्यांचे वर्गमित्र असल्याने ते मित्र आहेत. तसेच हुसेन डांगे आणि अमन शेख हे दोघे अनिल चौधरी याचे मित्र असल्याने चौहान त्यांना ओळखतात. चौहान याचे वडील एका बड्या कंपनीत सीईओ पदावर कार्यरत आहेत.
चौहान हा महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहतो. पैशांची गरज असल्याने त्याच्या मित्रांनी त्याला लुटण्याचा ‘प्लॅन’ केला. काही महिन्यांपूर्वी गस्तीवर असताना दोघा पोलिसांनी चौधरी, शेख, डांगे या तिघांना हटकले होते. त्यातून त्यांची आणि पोलिसांची ओळख झाली. त्यातूनच त्यांनी आपल्या ‘प्लॅन’मध्ये दोघा पोलिसांना सामावून घेतले. त्यानुसार १० फेब्रुवारीला दुपारी सव्वाबाराला मित्रांनी गांजा सदृष्य पाने असलेली एक पुडी चौहान याच्या खिश्यात टाकली. त्यानंतर हे सगळेजण किवळे येथील कॅफे मायाज लॉन्ज येथे गेले. तेथे पोलीस कर्मचारी गायकवाड आणि शेजाळ हे ठरल्यानुसार पोहोचले. सर्वांच्या खिश्यांची तपासणी केल्यावर चौहान याच्या खिश्यात टाकलेली पुडी गायकवाड आणि शेजाळ यांनी बाहेर काढली. त्यानंतर चौहान याच्यासह सगळे गहुंजे स्टेडीयम येथे गेले.
चौहान याला जबरदस्तीने कॅफे आणि गहुंजे येथे नेले होते. त्यानंतर त्याला इतरांसह देहूरोड पोलिस ठाण्यात नेले. गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये घालण्याची धमकी देत चौहान याच्या वडिलांशी संपर्क साधला. हा सगळा प्रकार टाळायचा असेल तर २० लाख रुपये द्या, अशी चौहाण याच्या वडिलांकडे मागणी केली.
पोलिसांसह इतरांच्या धमकीला घाबरलेल्या चौहान याच्या वडिलांनी वेगवेगळ्या अकाऊंटवर चार लाख ९८ हजार रुपये ट्रान्सफर केले. यानंतर चौहान याने पोलिसांकडे तक्रार केली. देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मुगुट पाटील तपास करत आहेत.