फेसबुकवारीतून नेत्रदानाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 02:21 AM2018-06-13T02:21:47+5:302018-06-13T02:21:47+5:30
यंदाची पाच जुलैपासून सुरू होणारी आषाढी वारी आधुनिकतेची जोड देत असतानाच जास्तीत जास्त लोकोपयोगी कशी होईल, यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध संस्थांच्या मार्फत विविध संकल्पना घेऊन वारीत वाटचाल करून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले जात आहे.
देहूगाव - यंदाची पाच जुलैपासून सुरू होणारी आषाढी वारी आधुनिकतेची जोड देत असतानाच जास्तीत जास्त लोकोपयोगी कशी होईल, यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध संस्थांच्या मार्फत विविध संकल्पना घेऊन वारीत वाटचाल करून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले जात आहे.
यामध्ये प्रामुख्याने वृक्षलागवड व संगोपन, निर्मलवारी, स्वच्छता अभियान यांसारख्या विविध संकल्पना या सोहळ्यादरम्यान लोकांच्या
मनावर बिंबवून काळानुरूप बदल स्वीकारले पाहिजेत. याचाच एक भाग म्हणजे यंदाचा 333वा पालखी सोहळा हा फेसबुक दिंडीच्या माध्यमातून घर घर दिंडी पोहचवण्याचे काम सुरू आहे.
यासाठी प्रतिवर्षी नवी संकल्पना घेऊन या वारीची वाटचाल केली
जात असते. याद्वारे या वर्षी फेसबुक दिंडीच्या टीमच्या वतीने नेत्रदान फेसबुक दिंडी ही नवी संकल्पना घेऊन सोहळ्यात सहभागी होणार आहे. ही नवी संकल्पना फेसबुक दिंडी
टीमच्या वतीने अभिनव उपक्रम ‘नेत्रवारी’ म्हणून पाहावे व
या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन फेसबुक दिंडीचे संचालक स्वप्निल मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. वारीबरोबर नेत्रदानाचाही प्रचार करण्याचा संकल्प युवकांनी केला आहे.
यासाठी जागतिक नेत्रदान दिवसाचे औचित्य साधून टीम रंगविशेष प्रस्तुत ‘नेत्रवारी’ हा प्रबोधनात्मक लघुपटही तयार करण्यात आला आहे. देशातील अंध बांधवांकडे फक्त दयेच्या भावनेतून न पाहता त्यांच्यासाठी काही तरी भरीव योगदान देण्याची गरज आहे आणि म्हणूनच फेसबुक दिंडी टीम या वर्षी नेत्रवारी या अभियानातून सर्वांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन करीत आहे. या उपक्रमातून देशबांधवांनी अंध व्यक्तींना डोळस करण्यासाठी नेत्रदान करावे. जेणेकरून त्यांनादेखील या सृष्टीला पाहण्याचा आनंद घेता येईल.