उद्योगनगरीत कंपन्यांसमोर सुशिक्षितांची वेठबिगारी

By admin | Published: October 5, 2015 01:46 AM2015-10-05T01:46:40+5:302015-10-05T01:46:40+5:30

कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर नोकरीच्या आशेने तासन्तास उभे राहणाऱ्या तरुणांचे विदारक वास्तव उद्योगनगरीत पहावयास मिळत आहे.

Facilitating education in front of industry | उद्योगनगरीत कंपन्यांसमोर सुशिक्षितांची वेठबिगारी

उद्योगनगरीत कंपन्यांसमोर सुशिक्षितांची वेठबिगारी

Next

नीलेश जंगम, पिंपरी
कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर नोकरीच्या आशेने तासन्तास उभे राहणाऱ्या तरुणांचे विदारक वास्तव उद्योगनगरीत पहावयास मिळत आहे. मजूर अड्ड्यावर दिसणाऱ्या मजूरांच्या लोंढ्यांप्रमाणे आयटीआय, तसेच अन्य शिक्षण घेतलेले सुक्षितांचे लोंढे कंपन्यांवर धडकू लागले आहेत.
दिवसभर थांबूनही काम न मिळाल्याने हे तरुण निराश होऊन परत माघारी फिरतात. दुसऱ्या दिवशी त्याच किंवा इतरत्र काम मिळवण्याचा प्रयत्न करतात. मंदीमुळे कंपन्यांमध्ये उत्पादनही कमी झाले आहे. यामुळे खूप अपेक्षा मनात बाळगून बोहरगावाहून आलेल्या या तरुणांचा रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जागतिक आर्थिक मंदीच्या झळा उद्योगनगरीलाही बसू लागल्या आहेत. या ठिकाणी आठ हजार लघुउद्योग, सुमारे १७५ मोठ्या कंपन्या आहेत. यापैकी ७० टक्के कंपन्या वाहन उद्योगाशी निगडीत आहेत. परदेशी कंपन्यांही या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे व्यवसायिक स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. परदेशातील कंपन्यांचे अ‍ॅटोमायझेशन आहे. त्या कंपन्यांमध्ये उच्च दर्जाची यंत्रणा वापरली जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी १० लोक काम करत होते, त्या ठिकाणी आता यंत्रावर १ किंवा दोनच कामगार काम करतात. त्यामुळे कामगार कपात झाली आहे.
भोसरी, चिंचवड व पिंपरी भागातील काही नामांकित कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर सकाळी सात वाजल्यापासूनच नोकरीच्या आशेने शेकडो तरुण उभे राहिलेले दिसतात. यामध्ये शहरासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून, तसेच परराज्यांतून नोकरीसाठी आलेल्यांची संख्या मोठी आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, जळगाव या या जिल्ह्यांतील, तसेच उत्तर प्रदेश, बिहार या परप्रांतांतून आलेले तरुण पूर्वीच शहरात स्थायिक झालेल्या एखाद्या तरुणाच्या ओळखीने शहरात येतात. काम मिळेपर्यंत सर्व जण एक खोली घेऊन एकत्र राहतात. एकमेकांच्या चर्चेतून शहरातील कंपन्यांची माहिती घेतात. काही कंपनीत थेट, तर काही कंपनीत ठेकेदारांच्या मदतीने काम मिळविण्याचा प्रयत्न करतात.
एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमध्ये कालावधी, तर काही कंपनीत रोजंदारी पद्धतीने काम असते. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा झालेली तरुण सकाळी आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे घेऊन कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी लावतात. प्रवेशद्वाराच्या बाजूलाच संबंधित कंपनीचे काही ठेकेदार असतात. व्यवस्थापनाकडून जशी मागणी होते, त्यानुसार पात्र झालेल्या तरुणांना कामाची संधी मिळते. इतर तरुण निराश होऊन परत निघून जातात व दुसऱ्या दिवशी परत कामाच्या अपेक्षेने येतात. उत्तर प्रदेश बिहारचे तरुण जड, कष्टाचे काम करण्यास तयार होतात. या कंपन्यांमध्ये दिवसाला ३०० ते ५०० रुपयांपर्यंत हजेरी दिली जाते.

Web Title: Facilitating education in front of industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.