सोयीसुविधा पुरवण्याची सूचना
By admin | Published: April 25, 2017 04:12 AM2017-04-25T04:12:23+5:302017-04-25T04:12:23+5:30
घोरवडेश्वर डोंगरावर भाविक व पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात. पादचारी मार्गाची दुरवस्था दूर करावी.
देहूरोड : घोरवडेश्वर डोंगरावर भाविक व पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात. पादचारी मार्गाची दुरवस्था दूर करावी. विविध ठिकाणी अर्धवट असलेल्या पायऱ्यांचे काम पूर्ण करावे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावे. परिसरातील अस्वच्छता दूर करावी, अशा विविध सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भारतीय पुरातत्त्व विभागास केल्या आहेत. घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठान व कॅन्टोन्मेन्ट सदस्य रघुवीर शेलार यांनी खासदार बारणे यांना घोरवडेश्वर डोंगरावरील विकासकामांबाबत त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन साकडे घातले होते.
खासदार बारणे यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षकांना दिलेल्या सूचना पत्रानुसार शेलारवाडी येथील घोरावडेश्वर डोंगरावर लेणी, प्राचीन महादेव मंदिर व संत तुकाराम महाराजांचे अभ्यासाचे स्थान आहे. याठिकाणी मावळ तालुका, पुणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक भाविक दर सोमवारसह नियमित दर्शनासाठी येत असतात. महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी मोठी यात्रा भरते. सुमारे दोन अडीच लाख भाविक यात्रेला हजेरी लावत असतात. यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात
येतो. श्रावणी सोमवार, तुकारामबीज, आषाढी व कार्तिकी वारीच्या
निमित्ताने या डोंगरावर येत
असतात.
लेणीपर्यंत डोंगरावर जाण्यासाठी जो पादचारी मार्ग आहे, त्या मार्गावरील पायऱ्यांचे काम निम्या टप्प्यापर्यंत झाले आहे. परंतु, पुढील निम्या टप्प्याचे काम अर्धवट असल्याने अनेक भाविक घसरून पडत असल्याने गंभीर इजा व शारीरिक इजा होतात. सदर काम लवकरात लवकर पूर्ण करावे. महादेव मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाच्या सुरक्षित रेलिंगचे काम झाले आहे.
तशाच प्रकारचे काम तुकाराम महाराजांच्या अभ्यास गृहाकडे जाणाऱ्या रस्त्याचे करावे. सदर लेणीच्या ठिकाणी डोंगर चढून गेल्यावर भाविकांना पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. या ठिकाणी नवीन पाण्याची लाइन, पाण्याची टाकी व फिल्टर बसवून पिण्याच्या पाण्याची सोय करावी. लेणीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह सोय नसल्याने भाविकांची व पर्यटकांची गैरसोय होत आहे, असे पत्रात म्हटले आहे.
त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये अस्वच्छता निर्माण होत आहे. या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता गृहाची व्यवस्था करावी. डोंगरावरील भागात (लेणीच्या ठिकाणी) जाण्या येण्याच्या पादचारी मार्गावर पथदिव्यांची व्यवस्था अपुरी असल्याने रात्री व पहाटे लवकर जाणाऱ्या भाविकांची अडचण होत असल्याने आवश्यक ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करावी. भाविकांना व पर्यटकांना डोंगर चढून गेल्यावर थकवा जाणवतो. त्यामुळे त्यांना बसण्यासाठी निवारा शेडची व्यवस्था लवकरात लवकर करावी आदी सूचना बारणे यांनी केल्या आहेत.
घोरवडेश्वर डोंगरावरील विकासकामांबाबत कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे सदस्य रघुवीर शेलार व घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब पानमंद, विश्वस्थ दत्तात्रय तरस, मधुकर बोडके, पोपट भेगडे, निर्गुण बोडके, दत्तोपंत शेलार यांनी खासदार बारणे यांच्या कार्यालयात भेट घेऊन लक्ष घालण्याची विंनती केली
होती. (वार्ताहर)