फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, त्यावर्षी 'घाटाच्या राजाला' देणार मर्सिडिज; नितेश राणेंची जाहीर घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 05:23 PM2022-06-01T17:23:06+5:302022-06-01T17:37:53+5:30
यावेळी शर्यत पाहून भारावलेल्या नितेश राणे यांनी, देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंत, त्या वर्षीचं पहिलं बक्षीस आपण मर्सिडिज गाडी जाहीर करतो, अशी मोठी घोषणा केली.
पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीची संपूर्ण राज्यत जबरदस्त चर्चा सुरू होती. या शर्यतीसाठी जेसीबी, बलेरोपासून ते बुलेटपर्यंत तब्बल दीड कोटी रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. चिखली येथील ही शर्यत पाहण्यासाठी काल राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार नितेश राणेनींही हजेरी लावली होती. यावेळी शर्यत पाहून भारावलेल्या नितेश राणे यांनी, देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंत, त्या वर्षीचं पहिलं बक्षीस आपण मर्सिडिज गाडी जाहीर करतो, अशी मोठी घोषणा केली.
यावेळी नितेश राणे म्हणाले, "ज्या वर्षी आमचे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होतील, त्या वर्षी आमचे आमदार महेश लांडगे यांनी ही शर्यत परत आयोजित केल्यानंतर, त्या वर्षीचे पहिले बक्षीस हे मी माझ्याकडून मर्सिडिज गाडी जाहीर करतो. आता या दिवसापासून एवढीच प्रार्थना करायची, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परत एकदा देवेंद्र फडणवीस झालेच पाहीजे." यासंदर्भातील व्हिडिओही त्यांनी आपल्या फेसबूक अकाउंटवरून शेअर केला आहे. राणे यांनी ही घोषणा केल्यानंतर उपस्थितांमध्येही मोठा आनंद दिसून आला.
नितेश यांनी त्यांच्या ट्विटरवरूनही ही स्पर्धा सुरू असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते व्यासपीठावरून बैलगाडा शर्यतीचा आनंद घेताना दिसत आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देतानाही, "ज्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब होतील त्या वर्षी आमदार महेशदादा यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या राजाला (फायनल सम्राटला) माझ्याकडून मर्सिडिज गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल," असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. नितेश राणे यांनी ही पोस्ट भोसरीचे आमदार तथा पिंपरी-चिंचवडचेभाजपा शहराध्यक्ष महेश लंगडे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केली आहे. महत्वाचे म्हणजे, एकूण पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नितेश राणे, प्रकाश जावडेकर आणि सदाभाऊ खोत आदी नेत्यांनीही हजेरी लावली होती.
"ज्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी साहेब होतील त्या वर्षी आमदार महेशदादा दादा यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या राजाला (फायनल सम्राटला) माझ्याकडून मर्सिडिज गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल." @maheshklandge@Dev_Fadnavispic.twitter.com/Pz2KPbP5bC
— nitesh rane (@NiteshNRane) May 31, 2022
या शर्यतीत, रामनाथ वारिंगे यांच्या बैलजोडीने केवळ 11:22 सेकंदांत घाट सर करत जेसीबी बक्षीस मिळवले. या जोडीबरोबरच इतर चार बैलजोड्यांनीही कमीत कमी वेळत हा घाट सर केला. यामुळे पाच जणांत हा जेसीबी बक्षीस म्हणून विभागून देण्यात आला. आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या या शर्यतीसाठी राज्य भरातून गाडामालकांनी सहभाग घेतला होता. तसेच, जवळपास १ हजार २०० बैल जोड्या अथवा गाड्यांनी या शर्यतीत भाग घेतला होता.