शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा नादात फसले; चुकीच्या टिप्स ऐकून गमावले ११ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 07:11 PM2022-05-15T19:11:14+5:302022-05-15T19:11:48+5:30
शेअर बाजारात चुकीच्या पद्धतीने पैसे गुंतवण्यासाठी सल्ला देत एकाचे सुमारे ११ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान केले
पिंपरी : गुंतवणुकीच्या टिप्स देऊन पैसे घेऊन तसेच चुकीच्या पद्धतीने पैसे गुंतवण्यास सांगितले. यातून सुमारे ११ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केली. वाकड येथे जानेवारी ते १४ मे २०२२ या कालावधीत ही घटना घडला.
निखिल नवीन खंडेलवाल (वय ३७, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिमन्यू, मोबाईल क्रमांक धारक एक अनोळखी व्यक्ती, आयसीआयसीआय बँकेचे दोन खाते धारक यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला फोन करून शेअर बाजारात गुंतवणुकीच्या टिप्स देतो, असे सांगितले. एक दिवस डेमो टिप्स दिल्या. त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपींनी दिशाभूल करून रजिस्ट्रेशन आणि सेवाशुल्क म्हणून फिर्यादीकडून एक लाख ६१ हजार १११ रुपये बँक खात्यावर घेतले. त्यानंतर फिर्यादीला फोन करून शेअर बाजारात चुकीच्या पद्धतीने पैसे गुंतवण्यासाठी सल्ला देत त्यांचे सुमारे ११ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल लोहार तपास करीत आहेत.