सावधान! फसवणुकीसाठी तयार केले जातेय पोलीस अधिकाऱ्यांचेच बनावट अकाऊंट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 05:33 PM2020-12-12T17:33:45+5:302020-12-12T17:34:59+5:30
सायबर चोरट्यांकडून सोशल मीडियाचा वापर
नारायण बडगुजर-
पिंपरी : पोलीस आयुक्त, तसेच पोलीस अधिकारी यांच्या नावने फेसबुकचे अकाऊंट किंवा पेज तयार करून त्यावरून पैशांची मागणी होत असल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे सायबर चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येते. अशा पद्धतीने ऑनलाईन फसवणूक तसेच सायबर क्राईमचे प्रकार सध्या वाढले आहेत. शहरातील नागरिकांनी गेल्यावर्षी ३००८ तर यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांमध्ये ३५८१ तक्रार अर्ज सायबर सेलकडे दाखल केले आहेत.
हिंजवडी-माण माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्क तसेच तळवडे साॅफ्टवेअर पार्कमुळे पिंपरी-चिंचवड शहराचे नाव देश-परदेशात पोहचले. संगणकतज्ज्ञांसह लाखो आयटीयन्स शहरात वास्तव्यास आले. तसेच मोबाईल फोनचे वापरकर्ते शहरात तुलनेने जास्त आहेत. त्यांना ‘टार्गेट’ करण्याचा ‘उद्योग’ सायबर गुन्हेगारांकडून होत आहे. कोरोनाकाळात सायबर क्राईमचे प्रमाण वाढले. त्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सर्वाधिक आहेत. सामान्य नागरिकांप्रमाणेच उच्चशिक्षित तसेच आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांना ऑनलाईन गंडा घातला जात आहे. विविध वस्तू खरेदी-विक्रीचा बहाणा तसेच भावनिक मुद्दा पुढे करून तसेच कर्ज देण्याच्या आमिषाने देखील फसवणूक केली जात आहे.
..............
असा घातला जातोय गंडा
बॅंकेतून बोलत असून, तुमचे एटीएम कार्ड, पेटीएम खाते अपडेट करायचे आहे, असे सांगून संबंधितांच्या बॅंक खात्यातील पैशांवर डल्ला मारला जात आहे. तसेच व्हाॅटसअप हॅक करून देखील तसेच व्हाॅटसअपवरून ओळख करून पैशांची मागणी केली जात आहे. बक्षीस लागले आहे, तुम्हाला बोनस देण्यात येत आहे, असे मेसेज करून देखील पैशांची मागणी करून फसवणूक केली जाते.
.........................
दोन वर्षांत ४१७ तक्रारींचा निपटारा
पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सायबर सेलकडे थेट तसेच ऑनलाईन पद्धतीने तक्रारदारांकडून अर्ज केले जातात. यंदा जानेवारी ते नाेव्हेंबर या ११ महिन्यांत १२५० थेट तर २३३१ अर्ज ऑनलाईन असे एकूण ३५८१ तक्रार अर्ज यंदा दाखल झाले. यातील १०८ अर्जांचा निपटारा करण्यात आला. तर ९९५ तक्रार अर्ज संबंधित पोलीस ठाण्यांकडे देण्यात आले. त्याचप्रमाणे २०१९ मध्ये दाखल झालेल्या ३००८ तक्रार अर्जांपैकी ३०९ अर्जांचा निपटारा सायबर सेलने केला तर २६९९ अर्ज पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आले. सायबर सेलने दोन वर्षांत ४१७ तक्रार अर्जांचा निपटारा केला.
..............
फेसबुक, व्हाटसअप अशा सोशल मीडियावरून पैशांची मागणी होत असल्यास संबंधित व्यक्तीशी थेट बोलणे करावे, पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे बॅंक खाते, मोबाईल फोन नंबर आदी बाबतीत खात्री करून घ्यावी. तसेच बोनस, बक्षीस, कमी व्याजाचे कर्ज अशा पद्धतीने कोणत्याही आमिषाला बळी न पडता अशा प्रकारांत कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये. सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, तसेच अधिक सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या अकाऊंटची सेटींग करावी.
- प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा