पिंपरीत बनावट चलनी नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; तीन संशयित आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 01:30 PM2020-08-18T13:30:39+5:302020-08-18T13:31:49+5:30
दोन लाख ९८ हजारांच्या बनावट नोटा जप्त
पिंपरी : बनावट चलनी नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करून दोन लाख ९८ हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना पोलिसांनी सोमवारी (दि. १७) अटक केली आहे. पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली.
अभिषेक प्रदीप कटारिया (वय १९, रा. आनंद पार्क, थेरगाव), ओंकार शशिकांत जाधव (वय १९, रा. केशवनगर, चिंचवड), सुरेश भगवान पाटोळे (वय ४०, रा. ओंकार नगर, पाटेवस्ती, आनंदवन आश्रम, फुगेवाडी), असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी शहाजी वसंत धायगुडे (वय ३४) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे रविवारी (दि. १६) रात्री पावणेदहाच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुंबई - पुणे महामार्गावर आकुर्डी येथील खंडोबामाळ चौकाजवळ नाकाबंदी केली. त्यावेळी रात्री साडेदहाच्या सुमारास खंडोबामाळ चौकाकडून एक लाल रंगाचे चारचाकी वाहन आले. त्या वाहनाला दुचाकी आडवी घालून थांबविले. वाहन पळवून नेण्याबाबत वाहनातील दोघांनी पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या डॅशबोर्डमध्ये २ लाख ९८ हजार रुपये मिळून आले. त्यामध्ये दोन हजारांच्या १४९ बनावट चलनी नोटा होत्या. त्यांनी दोन जणांकडून या नोटा आणल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे, पुरूषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी शहाजी धायगुडे, उमेश वानखडे, जावेद बागसीराज यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
..........................
आणखी संशयित आरोपींचा शोध
बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासकार्य सुरू केले आहे. त्यासाठी दोन पथके रवाना केली आहेत. तसेच अटक केलेल्या आरोपींकडून आणची गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.