पैसे उकळण्यासाठी बनावट फेसबुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 01:03 AM2018-12-04T01:03:08+5:302018-12-04T01:03:27+5:30

वाकड पोलिसांच्या हद्दीत शनिवारी रात्री व्यावसायिकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे

Fake Facebook to boil money | पैसे उकळण्यासाठी बनावट फेसबुक

पैसे उकळण्यासाठी बनावट फेसबुक

Next

पिंपरी : वाकड पोलिसांच्या हद्दीत शनिवारी रात्री व्यावसायिकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर दोन आरोपी फरार झाले आहेत. आरोपी ज्या मोटारीतून आले होते, ती मोटार तेथेच सोडून गेले असल्याने पोलिसांनी या मोटारीबद्दलची माहिती मिळविली. त्या आधारे आरोपींचा शोध घेणे शक्य झाले. फिर्यादीकडून पैसे उकळण्यासाठी बनावट अकाउंटचा वापर केला, तसेच हे आरोपी मुळशीतील गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण ज्ञानदेव काळे (कोथरूड), अभिलाष दत्तात्रय मोहोळ (शिवणे), रोहित प्रदीप देवळे, अक्षय भीमराव गोडंबे या आरोपींना अटक केली आहे, तर उर्वरित दोन आरोपी अद्याप फरार आहेत. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी फिर्यादीच्या मागावर आले होते. हरिओम मेहरसिंग सिंग (वय ३०) हे फिर्यादी मुंबई-बंगळुरू महामार्गालगत वाकड हद्दीत सिगारेट घेण्यासाठी पान टपरीवर थांबले असता, आरोपी त्यांच्या मोटारीत बसले. फिर्यादी मोटारीत आले त्या वेळी आरोपींनी त्यांना पिस्तूल दाखविले. फिर्यादी मोटारीतून बाहेर पडून आरडाओरडा करीत पळू लागले. त्या वेळी हल्लेखोरांनी पिस्तुलातून त्यांच्या दिशेने गोळी झाडली. फिर्यादी सिंग यांच्या मांडीतून गोळी आरपार गेली. ते जखमी झाले. आरडाओरडा करता नागरिक जमा झाल्याने हल्लेखोर त्यांनी आणलेली मोटार तेथेच सोडून पळून गेले.
गोळीबार प्रकरणात वाकड पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये किरण काळे या आरोपीने इंटेरियर डिझायनिंगचे शिक्षण घेतलेले आहे. अभिलाष मोहोळ हा आरोपी बीएस्सीपर्यंत शिकलेला आहे. रोहित देवळे, अक्षय गोडंबे हे दोन आरोपी मात्र बारावीपर्यंत शिकलेले आहेत. या आरोपींपैकी दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. हे चार आरोपी मोटारीतून आले होते. तर उर्वरित दोघे दुचाकीवरून आले होते. मोटारीतून आलेले आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. दुचाकीवरून आलेले मात्र फरार झाले आहेत.
>बोगस अकाउंटद्वारे पाठविली फ्रेंड रिक्वेस्ट
हल्लेखोरांनी बनावट फेसबुक अकाउंट उघडून फिर्यादीस फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दक्षिणेतील अभिनेत्रीच्या छायाचित्राचा डीपी लावून ते फिर्यादीच्या संपर्कात होते. फिर्यादी शाळा, महाविद्यालयांचे प्रवेश मिळवून देण्याचे, परदेशात अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याचे काम करीत असल्याची माहिती आरोपींनी मिळवली. त्याच्याकडून मोठी रक्कम उकळता येईल, या दृष्टीने त्यांनी योजना आखली. फिर्यादी काही दिवस परगावी गेले असल्याने आरोपींनी ते परत येण्यापर्यंत प्रतीक्षा केली. फेसबुकच्या माध्यमातून ते फिर्यादीच्या संपर्कात होते. फिर्यादी परगावहून येताच आरोपी त्यांच्या मागावर राहिले. शनिवारी त्यांनी फिर्यादीला धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला. फेसबुकच्या माध्यमातून आरोपींनी सावज शोधल्याचे तपासात पुढे आले आहे.

Web Title: Fake Facebook to boil money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.