ग्रामविकास सोसायटीच्या मतदार यादीत बनावट नाव; भाजपच्या नेत्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 17:51 IST2021-02-22T17:50:35+5:302021-02-22T17:51:07+5:30
न्यायालयाने सुनावली २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी...

ग्रामविकास सोसायटीच्या मतदार यादीत बनावट नाव; भाजपच्या नेत्याला अटक
वडगाव मावळ : विकास सोसायटीच्या मतदार यादीत बनावट नाव नमूद करून बनावट ठराव करून घेतल्या प्रकरणी भाजपचे जेष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे यांच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर नेवाळे यांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सन २०१५ मध्ये गोवित्री ग्राम विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निवडणुकी करता बनवण्यात आलेल्या मतदारयादीमध्ये बाळासाहेब नेवाळे यांच्या सांगण्यावरून सोसायटीचे सभासद नसलेले प्रकाश गायकवाड व बाळू आखाडे यांचे नाव नमूद केले आणि त्यांचा बनावट सभासद नंबर टाकून आणि ती बनावट मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांना सबमिट केली. त्याचबरोबर दिनांक २४ डिसेंबर २०१९ रोजी जिल्हा बँकेच्या सभासद पदाच्या निवडी करिता सोसायटीकडून पाठवण्यात येणारा एक उमेदवार स्वतः बाळासाहेब नेवाळे आहेत, असा संचालकांची मीटिंग घेऊन प्रस्ताव तयार करून सदरचा बनावट व खोटा प्रस्ताव सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सबमिट केला. त्यामुळे त्यांच्यावर व इतर तिघांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम हे करत आहे
नेवाळे एकेकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्येही त्यांना कोणते महत्वाचे पद मिळाले नाही. मावळ मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके विजयी झाले. तेव्हापासून त्यांचे राजकीय वजन कमी झाले.दोन महिण्यापूर्वी त्यांनी जिल्हा बॅंकेच्या संचालक पदाचा राजीनामा देखील दिला. त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊ नये यासाठी अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील सांगितले आहे.