पिंपरीत बनावट सही, शिक्का वापरून तयार केला खोटा दस्त; न्यायालयाची दिशाभूल करून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 03:44 PM2022-02-17T15:44:15+5:302022-02-17T15:50:25+5:30
२०१७ ते २८ मार्च २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला
पिंपरी : कंपनीचा बनावट शिक्का तयार करून तसेच बनावट सही खोटा दस्त तयार केला. यातून व्यावसायिकाची आणि न्यायालयाची फसवणूक केली. पिंपरी येथे ४ डिसेंबर २०१७ ते २८ मार्च २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. रोहित शंकर काळभोर (वय ३५), शंकर नामदेव काळभोर (वय ५८, दोघे रा. प्राधिकरण, पुणे), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पवन मनोहरलाल लोढा (वय ३४, रा. निगडी प्राधिकरण) यांनी बुधवारी (दि. १६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. कोहिनूर ट्रेडहोम प्रा. ली. या कंपनीचे संचालक रोहित काळभोर आणि व्यवस्थापक शंकर काळभोर यांना फिर्यादीच्या एक्साया अॅलॉईज प्रा. ली. या कंपनीने विश्वासाने अनामतपोटी धनादेश दिला होता. त्या धनादेशाचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी व फिर्यादीच्या कंपनीचे नुकसान व्हावे यासाठी धनादेश वटवण्यासाठी बँकेत भरला. फिर्यादीच्या कंपनीचा खाते उतारा न्यायालयात दाखल केला. त्यावर फिर्यादीची बनावट सही करून एक्साया अॅलॉईज प्रा. ली. या कंपनीचा बनावट शिक्का तयार करून खोटा दस्त तयार केला. तसेच हा खोटा दस्त खरा आहे असे भासवले.
त्यानंतर न्यायालयात दाखल असलेल्या फौजदारी खटल्यातील खाते उतारा हस्ताक्षर पडताळणीसाठी पाठवला. त्यात फिर्यादी यांची सही आणि खाते उताऱ्यावरील सहीमध्ये तफावत आढळून आली. आरोपींनी फिर्यादीच्या कंपनीचा बनावट शिक्का आणि सही करून फिर्यादीची फसवणूक केली. तसेच न्यायालयाची दिशाभूल करून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार पतंगे तपास करीत आहेत.