नोकरीस लावण्याचे आमिष दाखवित दिली बनावट नियुक्तीपत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 01:51 PM2019-03-18T13:51:52+5:302019-03-18T13:52:57+5:30
नोकरीस लावण्याचे आमिष दाखवित बनावट नियुक्तीपत्रे देत ३५ लाख २५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी : नोकरीस लावण्याचे आमिष दाखवित बनावट नियुक्तीपत्रे देत ३५ लाख २५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय मधुकर माळवदे, सपना संजय माळवदे, रितेश संजय माळवदे (रा.पेबल्स घर क्रमांक १०७, बावधान, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पंढरीनाथ उर्फ उदय उत्तम शिंदे (वय ३३, रा. गुरुकृपा बिल्डिंग, अंजनीनगर, कात्रज) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २०१२ ते २०१६ या कालावधीत फिर्यादी शिंदे यांचा भाऊ दत्ता शिंदे, फिर्यादीची पत्नी पुनम पंढरीनाथ शिंदे तसेच फिर्यादीचे ओळखीचे मुकुंद शवाजी चव्हाण, रेवन काटकर, प्रशांत गायकवाड, दिगंबर मोहन चिन्ने, शिवराज लोंढे यांना महावितरण व खासगी कंपनीत नोकरीस लावण्याचे आमिष आरोपीने दाखविले. या सर्वांकडून ३६ लाख २५ हजार रुपये घेतले.
तसेच मुकुंद चव्हाण, रेवन काटकर, दिगंबर चिन्ने, भाऊ शिंदे यांना महावितरणच्या कल्याणमधील कार्यालयामध्ये नोकरीस लावल्याची बनावट नियुक्तीपत्रे दिली. तसेच फिर्यादीस १ लाख रुपये परत दिले. मात्र, उर्वरित ३५ लाख २५ हजार रुपये न देता व नोकरीस न लावता फसवणूक केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.