घरासमोर डीजे वाजवण्यास मनाई केल्याने कुटुंबावर हल्ला, मावळ तालुक्यातील घटना
By नारायण बडगुजर | Published: September 27, 2023 09:03 PM2023-09-27T21:03:11+5:302023-09-27T21:04:00+5:30
मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील शिंदे वस्ती परिसरात सोमवारी (दि. २५) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली...
पिंपरी : घरातील मुलाची मयत झाल्याने घरासमोर डीजे वाजवण्यास मनाई केली. या कारणावरून मिरवणुकीतील २१ जणांनी कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील शिंदे वस्ती परिसरात सोमवारी (दि. २५) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
सुनील प्रभाकर शिंदे (३८, रा . शिंदे वस्ती, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी सुनील बंदा रजपूत (२८), मुकेश करसन रजपूत (२६), रवी करसन रजपूत (३०), सनी करसन रजपूत (३२), प्रवीण करसन रजपूत (३०), अक्षय ज्ञानेश्वर काकडे (२८), अतुल वेलसी रजपूत (२१), कृष्णा बलभीम खराते (२३), रवी हिरा रजपूत (२८), संदीप रमेश रजपूत (२९), विशाल काळुराम रजपूत (२९), संतोष काळूराम राजपूत (२५), विलास हिरा रजपूत (२२), अनिल हिम्मत रजपूत (३१), करसन जयंती रजपूत (५०), दीपक हिम्मत रजपूत (३२), आकाश अशोक रजपूत (२१), काळुराम भिका रजपूत (५५), वसंत भिका रजपूत (५१), अमित वेलसी राजपूत (२४), रमेश जयंती रजपूत (५०, सर्व रा. शिंदे वस्ती, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे) यांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील शिंदे यांच्या मुलाचे काही दिवसापूर्वीच निधन झाले. दरम्यान, फिर्यादी शिंदे यांच्या घरासमोरून सोमवारी (दि. २५) मिरवणूक जात होती. फिर्यादी शिंदे यांनी परिस्थितीची कल्पना देत डीजे बंद करण्यास सांगितला. यावेळी गणपती विसर्जन करून परतत असताना सुनील रजपूत आणि इतरांनी आम्हाला ढोल ताशे डीजे वाजवू का दिला नाही या रागातून फिर्यादी शिंदे, त्यांचा मित्र किरण येवले, भाऊ गणेश शिंदे, आई, वडील सदाशिव शिंदे व चालक जन्मराज कांबळे यांना काठ्यांनी कोयत्यांनी व लोखंडी सळईने मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. तसेच फिर्यादी शिंदे व त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी शिंदे याच्या घरावर हल्ला केला. यातून परिसरात दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.