मावळातील ‘फार्म हाऊस’ ठरताहेत गुन्हेगारांसाठी अवैध धंद्यांचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 06:19 AM2019-02-12T06:19:56+5:302019-02-12T06:20:17+5:30
ग्रामीण भागातील ‘फार्म हाऊस’चा वापर गुन्हेगार, तसेच काही राजकीय मंडळी बहुउद्देशीय केंद्र म्हणून करू लागली आहेत. खेड्यालगतच्या आणि गावच्या लोकवस्तीपासून काही अंतर दूर असलेल्या फार्म हाऊसमध्ये अनेक गुन्हेगारी स्वरुपाचे प्रकार घडू लागले आहेत.
- संजय माने
पिंपरी : ग्रामीण भागातील ‘फार्म हाऊस’चा वापर गुन्हेगार, तसेच काही राजकीय मंडळी बहुउद्देशीय केंद्र म्हणून करू लागली आहेत. खेड्यालगतच्या आणि गावच्या लोकवस्तीपासून काही अंतर दूर असलेल्या फार्म हाऊसमध्ये अनेक गुन्हेगारी स्वरुपाचे प्रकार घडू लागले आहेत.
नोव्हेंबरमध्ये चाकणजवळील एका फार्म हाऊसमध्ये गुन्हेगारांनी पिस्तूल, गावठी कट्टे ठेवले असल्याचे चाकण पोलिसांना आढळून आले होते. ही घटना ताजी असताना, मावळातील फळणे गावालगतच्या फार्म हाऊसवर बारबालांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारे विविध गुन्हेगारी कृत्यांसाठी फार्म हाऊस उपयोगात आणली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
शेतातील घर अशा संकल्पनेतून फार्म हाऊस साकारले जात असले, तरी निर्जन आणि लोकवस्तीच्या काही अंतर दूर असलेल्या फार्म हाऊसचा वापर नको त्या कामांसाठी सर्रासपणे केला जात आहे. शहरातील काही बड्या राजकीय नेत्यांची, उद्योजकांची, व्यावसायिकांची अशी फार्म हाऊस आहेत. एरवी ओसाड पडणाऱ्या या ‘फार्म हाऊस’च्या दिशेने अचानक कधी तरी महिना-दोन महिन्यांतून मोटारींचा ताफा
आलेला गावकºयांना पहावयास मिळतो. शांत, नीरव वातावरण असलेल्या खेड्यांमध्ये कधी तरी
फार्म हाऊसमधून गाण्यांचा आवाज येतो. डीजेच्या तालावर ठेका धरलेल्या तरुण-तरुणींचा आरडाओरडा ऐकू येत असतो. शहरातील डान्स बारमधील छमछम फार्म हाऊसच्या निमित्ताने गावकºयांच्या कानावर पडते; परंतु प्रत्यक्षात फार्म हाऊसमध्ये आत
काय घडते, याचा थांगपत्ता त्यांना लागत नाही.
कोणाचेही नाही नियंत्रण
असाच प्रकार वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंदर मावळातील फळणे गावात दोन दिवसांपूर्वी घडला. पनवेलच्या डान्स बारमध्ये नाचणाºया बारबाला शुक्रवारी रात्रीच्या अंधारात गावातील पायवाटांनी पळत असल्याचे दृश्य काही ग्रामस्थांना पहावयास मिळाले. पिस्तूल रोखून पाठलाग करणाºया आरोपींच्या तावडीतून सुटका करण्यासाठी संकटात सापडलेल्या या बारबाला गावातील तरुणांकडे मदतीची याचना करीत होत्या.
वडगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बारबालांची सुखरूप सुटका केली. मात्र या घटनेमुळे फार्म हाऊसच्या गैरवापराचा मुद्दा चर्चेत आला आहे.तसेच, या भागातील फार्म हाऊसवर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. त्यामुळे पोलिसांनी यापुढे फार्म हाऊसवर करडी नजर ठेवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
पिस्तूल साठ्यासाठी उपयोग...
पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना नोव्हेंबरमध्ये भोसरी पोलिसांनी अटक केली. पिस्तूल विक्रीच्या गुन्ह्यात वारंवार ते पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता, उत्तर प्रदेशमधून विक्रीसाठी आणलेले पिस्तूल चाकणजवळील एका फार्म हाऊसमध्ये लपवून ठेवल्याची माहिती आरोपींनी दिली. भोसरी आणि चाकण पोलिसांनी फार्म हाऊसची तपासणी केली असता, त्यांना सात पिस्तूल त्या ठिकाणी आढळून आली. फार्म हाऊसचा वापर बेकायदा पिस्तूल साठा करण्यासाठी केला जात असल्याचे त्या घटनेमुळे निदर्शनास आले होते.
गुन्ह्यांचे रचले जातात कट
१) गुन्हेगारी कारवायांसंबंधीची चर्चा, नियोजन करण्यासाठी अनेकदा गुन्हेगार फार्म हाऊसचा उपयोग करतात. खून, दरोडा अशा गुन्हेगारी कृत्यांचा कट अशाच ठिकाणी रचला जातो. अमली पदार्थ, बेकायदा शस्त्रसाठा करण्यासाठीही फार्म हाऊसचा राजरोसपणे वापर केला जात आहे, ही बाब निदर्शनास आली आहे. फार्म हाऊसचा वापर कशासाठी केला जात आहे, याबद्दल फार्म हाऊसचे मालक अनभिज्ञ असतात, की त्यांची त्यास मूकसंमती असते, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.
गुन्हेगारांचे होतेय आश्रयस्थान
२) गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत असतात. हे फरार झालेले आरोपी फार्म हाऊसचा आश्रय घेतात. राजकारणात सक्रिय, पण गुन्हेगारी पार्श्वभूमी
असलेले काही आरोपी पोलिसांचा ससेमिरा
चुकविण्यासाठी फार्म हाऊसचा आधार घेतात. वेगवेगळ्या फार्म हाऊसमध्ये ते अनेक दिवस काढतात. राजकारणी आणि गुन्हेगार यांचे सलोख्याचे संबंध असलेल्या व्यक्ती फार्म हाऊसमध्ये आसरा घेऊन पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरतात.