मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत पिंपरीत रविवारी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 02:21 PM2018-02-10T14:21:52+5:302018-02-10T14:39:18+5:30
पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत येत्या रविवारी लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
पिंपरी : पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत येत्या रविवारी लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणात विविध संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन, पीसीसीएफने केले आहे.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी सकाळी साडेदहा वाजता लाक्षणिक उपोषणाला सुरुवात होणार आहे. हे उपोषण सायंकाळी पाचपर्यंत असणार आहे. यामध्ये ग्राहक पंचायत पिंपरी-चिंचवड, संस्कार प्रतिष्ठान पुणे, आस्था सोशल फाऊंडेशन, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, भावसार व्हिजन, पिंपरी-चिंचवड, प्रदीप वाल्हेकर आणि टीम, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, पोलीस नागरिक मित्र महाराष्ट्र राज्य, एसबीआय पेन्शनर असोसिएशन, माउली ज्येष्ठ नागरिक संघ -आकुर्डी, फेडरेशन आॅफ घरकुल आणि जलदिंडी प्रतिष्ठान या संघटना सहभागी होतील.
केंद्र सरकारने यासाठी तत्त्वत: मंजुरी दिली असली, तरी देखील इतर सर्व स्तरांवरून या मागणीबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पीसीसीएफ’च्या मिस्ड कॉल मोहिमेस शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या लाक्षणिक उपोषणात पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली नाही
पिंपरी-चिचंवड सिटीझन फोरमच्या सदस्यांनी पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पालकमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने निधी देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असूनही या कामाच्या मंजुरीसाठी अडथळे निर्माण केले जात आहेत.