Pimpri Chinchwad: त्रिवेणीनगर-तळवडे रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीस्वार पित्याचा मृत्यू; मुलगा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 06:51 PM2023-12-12T18:51:24+5:302023-12-12T18:54:01+5:30
दुचाकीचालक डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला...
- औदुंबर पाडुळे
निगडी (पुणे) : त्रिवेणीनगर - तळवडे रस्त्यावर शनिवार पाठोपाठ मंगळवारी (दि. १२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास देखील भीषण अपघात झाला. १२ वर्षीय मुलासह जात असलेला दुचाकीचालक डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. यात त्याचा मुलगा थोडक्यात बचावला. नवनाथ भानूदास गायकवाड (वय ४०), असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. दीपक नवनाथ गायकवाड (१२, रा. सोनवणे वस्ती, ताथवडे) असे अपघातात बचावलेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ गायकवाड हे त्यांचा मुलगा दीपक याच्यासह दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्रिवेणीनगर-तळवडे रस्त्यावर भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे नवनाथ हे दुचाकीवरून खाली पडून डंपरसोबत शंभर मीटर अंतरापर्यंत फरपटत गेले. यात डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी मुलगा दीपक हा दुसऱ्या बाजूला पडल्यामुळे या अपघातातून बचावला.
अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि महापालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी रस्त्यावरील रक्ताचे डाग धुवून काढले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
चौथा भीषण अपघात
गेल्या काही दिवसांपासून त्रिवेणीनगर - तळवडे रस्त्यावर अपघतांची मालिका सुरू आहे. लगोपाठ होणारा हा चौथा अपघात आहे. गेल्या आठवड्यात ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नागरिकांनी ‘रास्ता रोको’ करून आंदोलन केले होते. सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट यांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी पुन्हा अपघात होऊन दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे.