निकामी झालेल्या होडीतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:22 PM2018-06-15T14:22:29+5:302018-06-15T14:22:29+5:30
वराळे-नाणोली इंद्रायणी नदीवर पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी ५० केली होती. परंतू अद्याप पूल झाला नाही.
पिंपरी: इंद्रायणीच्या अलीकडे-पलीकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारी दुवा आहे. नाणोली गावची लोकसंख्या तेराशेवर आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी त्यांना जवळचा मागॅ म्हणून होडीचा प्रवास करावा लागतो. येथील मुले-मुली वराळे व इतर गावांतील शाळेत जाण्यासाठी होडीचा वापर करतात. सध्या येण्याजाण्यासाठी असलेल्या होडीची अवस्था मात्र अतिशय बिकट झाली असून होडीच्या तळाला छिद्रे पडली आहेत. त्यामुळे होडीत पाणीसुध्दा येते. अशा धोकादायक होडीतून हे चिमुकले शाळेला गेले. हे भीषण वास्तव आहे वडगाव मावळ तालुक्यातील नाणोली आणि वराळे गावच्या ग्रामस्थांची....
गेल्या तीन पिढ्यांपासून शेतकरी,महिला,विद्यार्थी यांना नदीवर पूल नसल्याने इंद्रायणीच्या नदीपात्रातून निकामी झालेल्या होडीतने प्रवास करावा लागतो. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी होडीतून प्रवास करून शाळा गाठली. इंद्रायणीच्या अलीकडे-पलीकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारी दुवा आहे. नाणोली गावची लोकसंख्या तेराशेवर आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी त्यांना जवळचा मार्ग म्हणून होडीचा प्रवास करावा लागतो. येथील मुले-मुली वराळे इतर गावांतील शाळेत जाण्यासाठी होडीचा वापर करतात. सध्या असलेली होडीची अवस्था बिकट झाली असून तळाला छिद्रे पडली आहेत.त्यामुळे होडीत पाणी येते.
.......................
होडी चालविणा-यांची तिसरी पिढी
गावक-यांनी दिलेल्या बलुत्यावर तीन पिढ्यांपासून नावाड्यांचे कुटूंबीय उदरनिर्वाह करीत आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना झाडाच्या खोडाला तारा बांधल्या आहेत. त्या तारेच्या आधारे होडी ओढून नाव पुढे नेली जाते. सुरवातील दत्तोबा गऱ्हाणे यांनी होडी चालवली. यानंतर मुलगा बळीराम आणि सून बिबाबाई याही हाच व्यवसाय करत आहे. या मोबदल्यात पैसे न घेता धान्य घेतात. ग्रामस्थांची व शालेय विद्यार्थ्यांची सेवा आमच्या हातून घडते हे आमचे भाग्य आहे. परंतु, सध्या महागाईचे दिवस आहेत. नुसत्या धान्यावर घर चालत नाही. शासनाने अथवा दोन्ही ग्रामपंचायतींनी मानधन दिले पाहिजे असे बिबाबाई गºहाणे यांनी सांगितले.
...................
शासनाला जाग कधी येणार
वराळे-नाणोली इंद्रायणी नदीवर पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी ५० वर्षांपूर्वी केली होती. १९८५ मध्ये तत्कालीन मंत्री मदन बाफना यांनी भूमिपूजन केले होते.परंतू अद्याप पूल झाला नाही. सध्याची होडी निकामी झाली असून नवीन होडी द्यावी तसेच या पूलाचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी माजी सभापती धोंडीबा मराठे, माऊली मराठे, विशाल लोंढे,अरूण लोंढे,संतोष लोंढे,मल्हारी कोंडे यांनी केली आहे.जिल्हापरिषद सदस्य नितीन मराठे म्हणाले जिल्हापरिषेकडून नवीन नाव लवकर आणण्यात येईल.