मांसाहारी जेवणावरून आईशी वाद घालणाऱ्या वडिलांचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 03:57 PM2020-02-17T15:57:48+5:302020-02-17T16:00:13+5:30
कोरोना व्हायरस बाबतच्या मेसेज मुळे वाद?
पिंपरी : मांसाहारी जेवण तयार करून देण्यासाठी नकार दिल्याने आई व दारु पिऊन आलेले वडील यांच्यात वाद झाला. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुलाला वडिलांनी मारहाण केली. यात मुलाने लाकडी दांडक्याने डोक्यात मारल्याने वडिलांचा मूत्यू झाला. देहू येथील विठ्ठलवाडी येथे रविवारी (दि. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
दारू पिऊन आईला त्रास देणाऱ्या वडिलांना मुलाने लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने वडिलांचा मृत्यू झाला. देहूगाव येथील विठ्ठलवाडी येथे रविवारी (दि. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.
संतोष विठ्ठल येळवंडे (वय ४७) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. विराज संतोष येळवंडे (वय १९) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. तर त्याची आई कविता संतोष येळवंडे (वय ४०, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष येळवंडे त्यांची पत्नी फिर्यादी कविता यांना दारू पिऊन त्रास देत असत. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते अशाच पद्धतीने दारू पिऊन आले. मांसाहारी जेवण तयार करून दे, असा आग्रह त्यांनी पत्नी कविता यांच्याकडे धरला. रोगराई पसत आहे, कशाला अशा मांसाहार घेता व आम्हालाही मांसाहार करायला सांगतात, असे फिर्यादी कविता पती संतोष यांना म्हणाल्या. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. यात संतोष यांनी पत्नी कविता यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा मुलगा विराज याने त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतोष यांनी मुलगा विराज यालाही शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या वादात मुलगा विराज याने लाकडी दांडक्याने वडील संतोष यांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले. याबाबत शेजारील काही जणांना माहिती मिळाली. संतोष यांना पिंपरी येथील वायीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलगा विराज याला पोलिसांनी अटक केली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शाहीद पठाण तपास करीत आहेत.
कोरोना व्हायरस बाबतच्या मेसेज मुळे वाद?
चीनमध्ये कोरोना व्हायरसने हजारो जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाबाबत अनेक समज व गैरसमज आहेत. मांसाहरातून हा व्हायरस होत असल्याचा मेसेज तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. खातरजमा न करताच असे मेसेज फॉरवर्ड करण्यात येत आहेत. त्यामुळे मांसाहार धोकादायक असल्याचा बहुतांश जणांचा गैरसमज आहे. असाच समज झाल्याने कविता यांनी मांसाहारी जेवण तयार करण्यास नकार दिला. त्यामुळे पती संतोष येळवंडे यांनी कविता यांच्याशी वाद घातल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.