आत्महत्या केलेल्या मुलाच्या वर्षश्राद्धानंतर वडिलांची आत्महत्या
By नारायण बडगुजर | Published: September 1, 2022 01:18 PM2022-09-01T13:18:26+5:302022-09-01T13:18:38+5:30
मुलगा मजुरी तर वडील गवंडीचे काम करत होते
पिंपरी : गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मुलाचे वर्षश्राद्ध झाल्यानंतर वडिलांनीही आत्महत्या केली. बोपखेल येथे बुधवारी (दि. ३१) हा प्रकार उघडकीस आला. दारूच्या व्यसनातून गळफास घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बापू श्रीरंग शिंदे (वय ५६, रा. रामनगर, बोपखेल), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी आशा आणि मुलगा चेतन असा परिवार आहे. आशा शिंदे या मजुरी काम करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू शिंदे यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे ते घरी जात नव्हते. फिरस्ता असल्यासारखे ते बाहेरच असायचे. त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा बोपखले गावालगत मुळा नदीच्या परिसरात एका झाडाला गळफास घेतला. बोपखेल गावातील रामनगर भागातील काही मुले बुधवारी सकाळी मुळा नदी परिसरात गेले. त्यावेळी गळफास घेतलेल्या अवस्थेत बापू शिंदे आढळून आले. मुलांनी याबाबत रामनगर येथील काही नागरिकांना माहिती दिली. त्यानुसार नागरिकांनी ११२ क्रमांकावरून पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी दुपारी बाराच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
बापू शिंदे यांचा मोठा मुलगा विकी शिंदे याने गेल्या वर्षी गणेशोत्सवापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. विकी याचे वर्षश्राद्ध रविवारी (दि. २८) झाले. त्यानंतर वडील बापू शिंदे यांनी आत्महत्या केली. विकी शिंदे हा मजुरी तर त्याचे वडील बापू शिंदे हे गवंडी काम करीत होते.