मृत्यूच्या दाढेतून प्रवास, खापरे ओढा पूल केव्हाही कोसळण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 02:55 AM2018-01-06T02:55:21+5:302018-01-06T02:55:37+5:30
सांगवी-वडगाव मावळ रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पूल शेवटच्या घटका मोजत आहे. या अतिधोकादायक पुलाच्या दुरुस्तीअभावी ग्रामस्थांचा मृत्यूच्या दाढेतून प्रवास सुरू आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
वडगाव मावळ - सांगवी-वडगाव मावळ रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पूल शेवटच्या घटका मोजत आहे. या अतिधोकादायक पुलाच्या दुरुस्तीअभावी ग्रामस्थांचा मृत्यूच्या दाढेतून प्रवास सुरू आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या अतिधोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे पूल कोसळण्याच्या अवस्थेत असून, तो कोसळल्यास सांगवी गावचा संपर्क तुटून ग्रामस्थांना पर्यायी मार्ग उरणार नाही.
मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहराला जोडणाºया सांगवी रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पुलाचे दगडी बांधकाम पुणे जिल्हा परिषदेने ५५ वर्षांपूर्वी केले. या पुलाची अनेक वेळा तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. या पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून, पुलाचा बराच भाग खचला आहे. पूल कधीही कोसळून भीषण अपघात होण्याची भीती आहे.
पुलावरून विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी व ग्रामस्थांच्या दुचाकी व चारचाकींची वर्दळ सुरू असते. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या गावाचा संपर्क तुटतो. काही विद्यार्थी व ग्रामस्थ जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून ये-जा करतात.
रस्ता खड्डेमय : पुढाºयांकडून केवळ आश्वासन
पावसाळ्यात रस्ता मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने रस्ता खड्डेमय झाला आहे. निवडणूक काळात केवळ पूल दुरुस्तीच्या घोषणांचे आश्वासन पुढारी देतात. महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याने मावळ तालुक्यातील ब्रिटिशकालीन व धोकादायक पुलांच्या सुरक्षेच्या धर्तीवर या पुलाची केवळ प्रशासनाकडून पाहणी करून अवजड वाहने जाण्यास मज्जाव केल्याचा सूचनाफलक लावला आहे. मात्र, या फलकाकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. यामुळे दिवसेंदिवस या पुलाची अवस्था जीर्ण झाली असून, हा अतिधोकादायक पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी वारंवार ग्रामस्थ प्रशासनाकडे मागणी करीत असून, केवळ त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी आहे. जीवितहानी झाल्यावरच पुलाची दुरुस्ती करणार का, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.