आदिवासी भागाचा संपर्क तुटण्याची भीती
By admin | Published: June 13, 2016 01:48 AM2016-06-13T01:48:10+5:302016-06-13T01:48:10+5:30
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पाटण-भोईरवाडी रस्त्यावर कुशिरे घाटात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली
डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पाटण-भोईरवाडी रस्त्यावर कुशिरे घाटात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मागील पावसाळ्यात कोसळलेल्या दरडी व वाहून गेलेला रस्ता अद्यापही जशाचा तसाच असून, यंदाच्या पावसाळ्यात हा रस्ता बंदच होण्याच्या मार्गावर आहे. तसे झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात आहुपे-पाटण-तळेघर या आदिवासी भागाचा एकमेकांशी संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.
पाटण ते भोईरवाडी हा रस्ता आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला आपापसांत जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यामुळेच आहुपे, पाटण व भीमाशंकर या तीन खोऱ्यांत विभागलेला आंबेगाव तालुक्याचा आदिवासी भाग एकमेकांच्या जवळ आला आहे.
पूर्वी या भागाचा दौरा करावयाचा झाल्यास भीमाशंकर खोऱ्यासाठी वेगळा दिवस, तर आहुपे खोऱ्यासाठी वेगळा दिवस द्यावा लागायचा; परंतु पाटण-भोईरवाडी रस्त्यामुळे आता संपूर्ण आंबेगाव तालुक्याचा आदिवासी भाग एकाच दिवशी फिरून होतो. या भागातील भोईरवाडी, पिंपरी, कुशिरे खुर्द,
कुशिरे बुद्रुक, पाटण-महाळुंगे, मेघोली या आदिवासी गावांचीही दळणवळणाची होणारी गैरसोय या रस्त्यामुळे थांबली आहे. याच रस्त्यावर महाळुंगे येथे घोड नदीवर मोठा पूल टाकण्यात आला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील हा सर्वांत मोठा पूल आहे. या रस्त्यामुळेच तालुक्याच्या आदिवासी भागाचा संपर्क करणे सहज सोपे झाले असून, या भागाला पर्यायी रस्ता उपलब्ध झाला आहे. माळीण दुर्घटनेच्या वेळी डिंभे-बोरघर या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणाखाली आणण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला होता.
भीमाशंकरमार्गे जाताना तळेघर येथून हा रस्ता फळोदे गावावरून घाट उतरून खाली पाटण खोऱ्यात पोहोचतो व तेथून कुशिरे मार्गे घाट चढून पुन्हा भोईरवाडी येथे जातो. पुढे दोन ते तीन कि.मी.नंतर हा रस्ता आहुपे रस्त्याला मिळतो. या रस्त्यामुळे आदिवासी गावांना जोडणारे अंतरही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मात्र, मागील दोन वर्षांच्या कालावधीत भोईरवाडी ते कुशिरे या टप्प्यावर रस्त्याची डागडुजीच झाली नसल्याने कुशिरे घाटात या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. (वार्ताहर)
>मागील पावसाळ्यात या घाटात दरडी कोसळल्या असून, त्या अद्यापही रस्त्यावर तशाच पडून आहेत. घाटातून रस्ता वाहून गेला असून, काही ठिकाणी केवळ मोटारसायकल जाईल एवढाच रस्ता शिल्लक आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे हा रस्ता तुटून बाजूने खोलवर चर पडले आहेत.
> आदिवासी भागातील हा महत्त्वाचा रस्ता असूनही संबंधित विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे पाहावयास मिळत आहे. पावसाळ्यात हा रस्ता वाहून गेल्यास किंवा रस्त्यावर दरडी कोसळल्यास एकमेकांशी असणारा संपर्क तुटून गैरसोय होण्याची भीती आहे.