जगभ्रमंती करणाऱ्या वेदांगीचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:54 AM2019-01-06T01:54:37+5:302019-01-06T01:55:12+5:30
निगडीतील शाळेत झाला गौरव : सायकलवरून १३ देशांची केली सहल
पिंपरी : सायकलवरून १३ देशांची सहल करणाºया वेदांगी कुलकर्णीचा ज्ञानप्रबोधिनी, निगडीतर्फे विशेष सत्कार केला गेला. तिने केलेली भ्रमंती शाळेतील विद्यार्थ्यांना, तसेच भारतातील युवा पिढीला प्रेरणा देणारी आहे. वेदांगी ही ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे.
सत्कार समारंभासाठी संस्थेचे संचालक डॉ. गिरीश बापट, केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर, प्राचार्य सुभाष गदादे, पर्यवेक्षिका विद्या उदास, इंग्रजी विभागप्रमुख मधुरा लुंकड, वेदांगीचे वडील विवेक कुलकर्णी आदी उपस्थित होते. वेदांगीचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. वेदांगी कुलकर्णी म्हणाली, ‘‘तेरा देश, साडेपाच महिने आणि २९ हजार किलोमीटरचा प्रवास. प्रवासात आलेली जंगले, जंगली श्वापदे, ऊन, वारा, पाऊस, डोंगर, दºया, निसर्गाची हिरवळ, खळखळणारे पाणी, भेटणारे अनोळखी लोक, त्यांची होणारी मदत या सगळ्या गोष्टी एखाद्या कथेला साजेशा वाटतात. पण मी या सगळ्या गोष्टी स्वत: या प्रवासादरम्यान अनुभवल्या आहेत. सुरुवातीला मनाली ते खारडुंग ला हा अवघड प्रवास सायकलवरून केला. त्या वेळी सायकलप्रवासाची आवड वाढली. त्यानंतर इंग्लंड येथे शिक्षणासाठी गेले. तिथे शिक्षण घेत असताना इंग्लंडमधील ज्या खेळाडूंनी विविध क्षेत्रांत विक्रम केले आहेत, त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्या मार्गदर्शनातून इंग्लंडच्या एका टोकावरून दुसºया टोकाचा सायकल प्रवास यशस्वीपणे केला. तिथेही सायकल प्रवास करण्याचा आत्मविश्वास वाढला.
मनोज देवळेकर म्हणाले, ‘‘युवा पिढीला प्रेरणादायी काम वेदांगीने केले आहे. जगण्याची प्रेरणा तिच्याकडून मिळणार आहे.’’
विवेक कुलकर्णी यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.
अनुभव आणि आत्मविश्वास याच्या जोरावर सायकल प्रवासाचा जागतिक विक्रम बनविण्याचा निश्चय केला आणि प्रवास सुरू झाला. काळजी घेणारी अनेक माणसे वाटेत भेटली. कोणताही माणूस कधीच चुकीचा किंवा धोकादायक नसतो, याचा अनुभव या प्रवासात आला. त्यामुळे एकटीने जाण्याची भीती कधीच वाटली नाही. वादळे आली, जंगली प्राण्यांनी पाठलाग केला, पण त्यांचाही सामना करून हा प्रवास सुरू ठेवला.
- वेदांगी कुलकर्णी