पाणी परवाना देण्यासाठी ९० हजार रुपयांची लाच घेताना पवना पाटबंधारे कार्यालयातील महिला लिपिकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 05:50 PM2021-04-06T17:50:33+5:302021-04-06T17:52:07+5:30
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.....
वडगाव मावळ : पवना नदीपात्रातुन शेतीला पाणी पुरवठा परवानगी मिळवून देण्यासाठी तळेगाव येथील पवना पाटबंधारे कार्यालयाच्या महिला लिपिकाने १,२०,००० रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. मंगळवारी (दि.६) ९० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ अटक केली आहे.
पवनानगर जलसिंचन विभागाच्या सहायक अभियंता मोनिका रामदास ननावरे (वय ३१, रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने अटक केलेल्या महिला लिपिकाचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना करंजगाव येथील शेतीला पवना नदीपात्रातून पाणी परवाना घेण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील पवना पाटबंधारे विभागाचे कार्यालयात वारंवार जात होते.पाणी परवाना मिळवुन देण्यासाठी लिपिक मोनिका ननावरे यांनी तक्रारदार यांच्याकडे १,लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी करून ९० हजार देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात तक्रार केली.
पोलीस निरीक्षक अलका सरग, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे,पोलीस निरीक्षक सुनिल बिले,पोलीस हवालदार टिळेकर,पोलीस नाईक वैभव गोसावी ,चालक पोलीस हवालदार. प्रशांत वाळके या पथकाने सापळा रचून आरोपी लिपिक मोनिका ननावरे यांना ९० हजार रुपयांची लाच घेताना यांना रंगेहाथ अटक केली आहे. या संदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.