म्हाळुंगे गावात महिलेचा खून
By Admin | Published: July 4, 2017 03:51 AM2017-07-04T03:51:43+5:302017-07-04T03:51:43+5:30
घरात गेलेले शेजाऱ्याचे मांजर बाहेर फेकल्याच्या वादातून झालेल्या भांडणात लाकडी दांडक्याने महिलेला मारहाण करण्यात आली. त्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : घरात गेलेले शेजाऱ्याचे मांजर बाहेर फेकल्याच्या वादातून झालेल्या भांडणात लाकडी दांडक्याने महिलेला मारहाण करण्यात आली. त्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना म्हाळुंगे
(मुळशी) येथे रविवारी रात्री घडली. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रभा मोहन रंगपिसे (वय ४०, रा. सुहास पाडाळे चाळ, म्हाळुंगे, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभा यांचा मुलगा अजय मोहन रंगपिसे (वय २७) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अमोल संदीपान बालगुडे, गणेश उर्फ भैया श्रीमंत पाटील, आकाश राजेश मोंडे, राजू नंदकिशोर साळवे (रा.सर्व सुहास पाडाळे चाळ, म्हाळुंगे, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या मारहाणीत फिर्यादीचा भाऊ हृषिकेश रंगपिसे (वय १७), तसेच मेहुणे दादू भाऊसाहेब खलसे (वय ४६) हे जखमी झाले आहेत.
फिर्यादी अजय यांची बहीण सारिका खलसे यांचे मांजर शेजारीच राहणाऱ्या राजू साळवे यांच्या घरात गेले. त्यांनी ते मांजर रागाने बाहेर फेकले. याबाबत फिर्यादी यांचे मेहुणे दादू खलसे त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता, त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. राजू साळवे याच्यासह अन्य आरोपींनी फिर्यादीचा मेहुणा, भाऊ व आईला मारहाण केली. प्रभा यांच्या डोक्यात व पाठीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात जबर जखमी झाल्याने प्रभा यांचा मृत्यू झाला. आरोपींना अटक करण्यात आली आहे.