पिंपरीत टायरच्या गोदामाला भीषण आग; १९ रुग्णांना सुरक्षितपणे हलविले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 07:19 PM2023-01-31T19:19:10+5:302023-01-31T19:42:11+5:30
पिंपरी-चिंचवड, पुणे, पीएमआरडीए, टाटा मोटर्सचे तब्बल १४ बंब तीन तास आग नियंत्रणासाठी प्रयत्न करीत होते
पिंपरी : टायरच्या गोदामात भीषण आग लागून मोठी हानी झाली. कासारवाडी येथे मंगळवारी (दि. ३१) रात्री दोनच्या सुमारास लागलेली आग पहाटे पाच वाजता नियंत्रणात आली. आग भीषण असल्याने पिंपरी-चिंचवड, पुणे, पीएमआरडीए, टाटा मोटर्सचे तब्बल १४ बंब तीन तास आग नियंत्रणासाठी प्रयत्न करीत होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी १९ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविले. कोणीही जखमी झाले नाही.
महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथे एका रुग्णालया जवळ मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास जय गणेश टायर्स या टायरच्या गोदामात आग लागली. गोदामात जुने टायर होते. दुकानाचे मालक महावीर जैन आणि त्यांच्या आई कल्पना जैन यांनी घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीए मारुंजी, पुणे महापालिका, खडकी कंटोन्मेंट, टाटा मोटर्स यांचे प्रत्येकी एक, पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. एका जेसीबीची देखील मदत घेण्यात आली.
घटनास्थळाच्या शेजारी असलेल्या मैत्री अपार्टमेंटमधील नागरिकांनी प्रसंगावधान राखत सोसायटीमधील अग्निशामक पंप उपलब्ध करून दिला. हॉस्पिटलला लागून ही आग लागल्याने रुग्णांना याचा धोका होता. त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांनी रुग्णालयातील १९ रुग्णांना तत्काळ इतर रुग्णालयात हलविले. ही आग टायरच्या गोदामाला लागून असलेल्या कोटेश्वर टिंबरमध्ये पसरली. आगीचे लोळ आणि धुरांचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भिती होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.