सफाई कामगारांना पूर्ण वेतन न दिल्याने ठेकेदार कंपनीच्या संचालकासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 08:06 PM2021-07-25T20:06:10+5:302021-07-25T20:09:41+5:30
आरोपींनी आपसात संगणमत करून महापालिकेसोबत केलेल्या करारातील अटींचे पालन केले नाही. किमान वेतन कायदा व इतर अनुषंगिक कायद्यानुसार सफाई कामगारांना कामाची संपूर्ण रक्कम न देता महापालिकेची फसवणूक केली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना संबंधित ठेकेदार कंपनीने पूर्ण वेतन दिले नाही. या प्रकरणी ठेकेदार कंपनीच्या संचालकासह पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सात जणांना पोलिसांनीअटक केली आहे. हा प्रकार १६ डिसेंबर २०१७ ते २४ जुलै २०१९ या कालावधीत घडला.
संचालक हायगरीब एच गुरु (वय ६०), सहसंचालक मीनाक्षी एच गुरु (वय ३६, दोघे रा. भाईंदर ठाणे), अकाउंट फायनान्स चंदन जलधर मोहंती (वय ३६), मार्केटिंग रिक्रूटमेंट ऑफिसर प्रमोद उर्फ प्रमोद कुमार प्रफुल बेहुरा (वय ३९), मार्केटिंग व फिल्ड ऑफिसर कार्तिक सूर्यमनी तराई (वय ५१, तिघे रा. चिंचवड), मार्केटिंग व फिल्ड ऑफिसर पवन संभाजी पवार (वय २९, रा. तळवडे), सुपरवायझर बापू पांढरे (वय ३५, रा. रहाटणी), सुपरवायझर नितीन गुंडोपण माडलगी (वय ४६, रा. चिंचवड), विश्वनाथ विष्णू बराळ (वय ४०, रा. चिंचवड), अक्षय चंद्रकांत देवळे (वय २६), स्वप्नील गजानन काळे (वय ३२), नंदू ढोबळे (वय ३५), चंदा अशोक मगर (वय ४०), धनाजी खाडे (वय ४०, पाचजण रा. निगडी), ज्ञानेश्वर म्हाम्बरे (वय ४०, रा. चिखली) आणि इतर यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिका कामगार कल्याण अधिकारी प्रमोद श्रीरंग जगताप यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून महापालिकेसोबत केलेल्या करारातील अटींचे पालन केले नाही. किमान वेतन कायदा व इतर अनुषंगिक कायद्यानुसार सफाई कामगारांना कामाची संपूर्ण रक्कम न देता महापालिकेची फसवणूक केली. स्वतःच्या व कंपनीच्या फायद्यासाठी सफाई कामगारांचा विश्वास संपादन करून त्यांच्या बँक फॉर्मवर सह्या आणि अंगठे घेतले. सफाई कामगारांची बँक खाती उघडून काही कामगारांना मिळालेले बँकेचे एटीएम कार्ड व कागदपत्रे त्यांना धमकी देऊन बळजबरीने काढून घेतले. काही कामगारांनी किमान १३ हजार रुपये पगार द्यावा अशी मागणी केल्याने त्यांना कामावरून कमी करण्यात येईल अशी धमकी दिली.
कामगारांचे बँकेचे एटीएम व कागदपत्रे आरोपींनी स्वतःजवळ असल्याचा फायदा उचलून अद्यापपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येक कामगाराकडून चार हजार रुपये खंडणी मिळवली. अकुशल कामगारांना प्रत्यक्षात मिळणारे किमान वेतन न देता ते कमी प्रमाणात रोख स्वरूपात देऊन कामगारांचा विश्वासघात केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.