पाचवीचा विद्यार्थिही सोडवू शकतो दहावीची गणिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 02:39 AM2019-04-02T02:39:29+5:302019-04-02T02:39:57+5:30
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्व-अभ्यास कसा करावा, विद्यार्थी स्वत: स्वत:चे शिक्षक कसे बनू शकतात, याचे सुरुवातीला उदाहरणासहित गमक सांगण्यात आले.
पिंपरी : प्रेरणा माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित या विषयाची कार्यशाळा झाली. प्रसिद्ध गणितज्ञ रवीकुमार वरे व शिक्षणतज्ज्ञ पल्लवी कर्णिक यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. प्राचार्य यशवंत पवार, पर्यवेक्षक धनसिंग साबळे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, गणित व विज्ञान शिक्षक पांडुरंग दिवटे, अरुणा यशवंते, भीमराव शिरसाठ, अर्चना कदम उपस्थित होते.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्व-अभ्यास कसा करावा, विद्यार्थी स्वत: स्वत:चे शिक्षक कसे बनू शकतात, याचे सुरुवातीला उदाहरणासहित गमक सांगण्यात आले. दहावीची गणिते छोट्या छोट्या क्षमतांच्या स्वरूपात विभागून, तयार केलेल्या खास कृतिपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना नेमके काय चुकले याचा अचूक शोध घेता आला. या अनोख्या पद्धतीने पाचवीचा विद्यार्थीदेखील दहावीची गणिते सोडवू शकतो, हे पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले. धनसिंग साबळे यांनी आभार मानले.
गणित हा विषय एखाद्याला लहानपणापासूनच खूप आवडतो, पटकन जमतो तर एखाद्याला हा विषय पार रडकुंडीला आणतो. मुलांच्या मनातील गणिताची भीती घालवण्यासाठी व परीक्षेत गुण वाढावेत यासाठी काय केले पाहिजे याचे अचूक मार्गदर्शन मुलांना व्हावे यासाठी गणिताची कार्यशाळा आयोजित केली होती. - नाना शिवले
वरे यांनी विकसित केलेल्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांनी अभ्यास केला, तर विद्यार्थी दहावीचा अभ्यासक्रम स्वत: उन्हाळ्याच्या सुटीतच पूर्ण करू शकतात, हा फार मोठा विश्वास या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाला. अशा कार्यशाळेचे नियोजन अधूनमधून व्हावे अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.