पिंपरी-चिंचवडमध्ये इनव्हर्टरसाठी पाचव्यांदा मागविल्या निविदा : प्रतिसाद नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:40 PM2019-04-08T18:40:45+5:302019-04-08T18:45:56+5:30
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची आकुर्डीत पर्यावरणपूरक इमारत आहे.
पिंपरी : पाच महिन्यांपासून इनव्हर्टर बंद पडल्याने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा सौर उर्जा प्रकल्प बंद आहे. सुमारे १२ लाख रुपये किमतीच्या इनव्हर्टरसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गेल्या महिन्यात राबविलेल्या या निविदा प्रक्रियेस केवळ दोनच पुरवठादारांनी प्रतिसाद दिला. मात्र, नियमानुसार किमान तीन पुरवठादारांनी प्रतिसाद देणे आवश्यक आहे. त्यासाठी पुन्हा निविदा मागविण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची आकुर्डीत पर्यावरणपूरक इमारत आहे. या इमारतीसाठी २०१२ मध्ये सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पासाठी प्राधिकरणातर्फे नवीन इनव्हर्टरसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्यांदा प्रसिध्द केलेल्या निविदेस एकाही पुरवठादाराकडून प्रतिसाद मिळाला नाही. तिसऱ्यांदा प्रसिध्द केलेल्या निविदेस एका आणि चौथ्यांदा केवळ दोन पुरवठादारांनी प्रतिसाद दिला. नियमानुसार किमान तीन पुरवठादारांनी प्रतिसाद देणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन पुरवठादारांनी प्रतिसाद देऊनही पुन्हा नव्याने पाचव्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
शासकीय पुरवठादार मिळेना
निविदा प्रक्रियेत किचकट अटी आणि शर्तींमुळे अडथळे येत आहेत. १०० किलोवॅट क्षमतेचे इनव्हर्टर पुरवठा करण्याच्या अनुभवासह पाच वर्षे सुटे भाग पुरविण्यासह त्यांची देखभाल आणि दुरुस्ती अशा विविध अटींचा आणि शर्तींचा यात समावेश आहे. अशा पध्दतीचा शासकीय कामकाजाचा अनुभव असलेला पुरवठादार उपलब्ध होत नसल्याने निविदेसाठी साततत्याने पुनर्प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
महावितरणच्या विजेचा वापर
पाच महिन्यांपासून इनव्हर्टर नसल्याने सौर उर्जा प्रकल्प बंद असून, प्राधिकरणाच्या प्रशासकीय इमारतीसाठी पूर्णपणे महावितरण कंपनीची वीज वापरण्यात येत आहे. त्यासाठी एका महिन्याला सरासरी दीड लाख रुपये बील आकारण्यात येत आहेत. इनव्हर्टरची किंमत सुमारे १२ लाख रुपये आहे. मात्र त्याची खरेदी होत नसल्याने सुमारे सात लाख रुपयांचा भुर्दंड प्राधिकरणाला बसला आहे.
इनव्हर्टरसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. नियमानुसार अनुभव आणि कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या पुरवठादारांनी पुढे आले पाहिजे. त्यासाठी पुन्हा निविदा मागविल्या आहेत.
- प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग, प्राधिकरण