पिंपरी शहरात मास्क वाटप प्रकरणात पन्नास लाखांचा भ्रष्टाचार, शिवसेनेची मुख्यमंत्र्याकडे दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 12:51 AM2020-05-20T00:51:26+5:302020-05-20T00:53:17+5:30
प्रशासन व सत्ताधारी मंडळींनी जनाची नाही तर मनाची लाज वाटणे गरजेचे होते.
पिंपरी : कोरोना व्हायरस या रोगाच्या काळात शहरातील गरजू झोपडपट्टी मधील गरीब नागरिकांच्या नावाचा गोंडस वापर करून दीड कोटीचे मास्क खरेदीमध्ये ५० लाखाचा भ्रष्टाचार करणाऱ्या प्रशासन व सत्ताधारी मंडळींनी जनाची नाही तर मनाची लाज वाटणे गरजेचे होते. एकीकडे अनेक कंपन्या, सामाजिक संस्था मास्क, सॅनिटायझर, अन्नधान्य मोफत पुरवत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, व सत्ताधारी पदाधिकारी मात्र मेलेल्या मढ्यावरचे लोणी खाण्यात व्यस्त आहेत. महिला बचत गटांना काम दिले ती चांगली गोष्ट आहे. परंतु, त्यांच्या नावाखाली चुकीची कामे करणे योग्य नाही. मास्क वाटप प्रकरणात दीड कोटीच्या कामात पन्नास लाखाचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे.
उबाळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. उबाळे म्हणाल्या, विविध महिला बचत गटाने सहा रुपयांना कापडी मास्क तेही चांगल्या दर्जाचे बनविले आहेत व त्याचे वाटप गरजू लोकांना केले देखील. मास्क बनविताना शहरातील सर्व बचत गटांना आव्हान केले असते तर महानगरपालिकेचे ५० लाख रुपये वाचले असते पण आपल्या राज्यात अंधेर नगरी चौपट राजा असे कामकाज चालू आहे. लाईफबॉय साबण खरेदीत ही असाच भ्रष्टाचार करून दुप्पट दराने खरेदी झाली आहे हे धंदे थांबवावेत व मास्क खरेदी प्रकरणाची चौकशी करून जास्तीची रक्कम जबाबदार अधिकारी यांचयकडून वसूल करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.