शहरात लढाऊ विमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 06:51 AM2017-07-26T06:51:08+5:302017-07-26T06:51:10+5:30

सायन्स पार्क हे विद्यार्थी आणि बालचमूचे आवडते ठिकाण बनले आहे. महापालिकेच्या पुढाकाराने मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्र संचालित केंद्र चिंचवड आॅटो क्लस्टरजवळ सुरू करण्यात आल्यानंतर राज्याच्या

Fighter aircraft in pimpri chinchwad | शहरात लढाऊ विमान

शहरात लढाऊ विमान

googlenewsNext

पिंपरी : सायन्स पार्क हे विद्यार्थी आणि बालचमूचे आवडते ठिकाण बनले आहे. महापालिकेच्या पुढाकाराने मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्र संचालित केंद्र चिंचवड आॅटो क्लस्टरजवळ सुरू करण्यात आल्यानंतर राज्याच्या विविध भागांतून विद्यार्थ्यांच्या सहली येऊ लागल्या. पिंपरी-चिंचवडमधील सायन्स पार्कचे महत्त्व वाढू लागल्याने त्या ठिकाणी तारांगण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असताना, कारगिल युद्धात भारतीय जवानांनी वापरात आणलेले मिग २३ हे लढाऊ विमान शनिवारी सायन्स पार्क आवारात दाखल झाले. हे विमान बालचमूचे आकर्षण ठरणारे असल्याने प्रवेशद्वाराजवळच ते उभे करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
महापालिकेच्या पुढाकाराने सुरू केलेल्या विज्ञान केंद्रात अनेक विज्ञान खेळणी आहेत. विद्यार्थी व लहान मुले विज्ञान केंद्रात आल्यानंतर विविध प्रकारच्या विज्ञान खेळण्यांपाशी मुले रमतात. केंद्रात आल्यानंतर त्यांच्यात विज्ञानाबद्दलची जिज्ञासा, कुतूहल दिसून येते. तेथे विज्ञानासंबंधीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे, तसेच शंकांचे निरसन केले जाते. थ्रीडी शो पाहण्याची संधी त्यांना मिळते. तारांगणाचाही त्यांना अनुभव घेता येईल, अशी व्यवस्था त्या ठिकाणी केली होती.
छोट्या अंधाºया तंबूत तारांगण निर्माण करून नभांगणातील ग्रह-ताºयांची माहिती त्यांना दिली जात असे. आता तारांगण प्रकल्प स्वतंत्रपणे उभारण्यात येत आहे. भव्य असे तारांगण उभारण्याचे काम सुरू आहे. स्थापत्यविषयक कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. शहरातील सायन्स प्रकल्प पर्यटक, तसेच शहरातील नागरिक, विद्यार्थी यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असताना, शनिवारी दाखल झालेल्या मिग २३ विमानाने त्यात आणखी भर पडली आहे. भारतीय वायुसेनेने हे विमान सायन्स पार्कला भेट दिले आहे. विमानाची किंमत आठ कोटी रुपये आहे. कारगिल युद्धात वापरल्यानंतर हे विमान सद्य:स्थितीत वापरात नव्हते. त्यामुळे विज्ञान केंद्रात प्रदर्शनासाठी हे विमान उपलब्ध करून देण्यात आले आहे.

विमान दाखल झाले : अन् लगबग झाली सुरू
भारतीय वायुसेनेकडून विमान सायन्स पार्कला उपलब्ध होणार असल्याची माहिती असताना, सायन्स पार्कमध्ये विमान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून ते अन्य कोणतीच पूर्वतयारी नसल्याचे दिसून आले. विमान तीन भागात येथे आणून ठेवले आहे. जॅकच्या साह्याने हे विमानाचे तुकडे सायन्स पार्कच्या प्रवेशद्वारालगत आणून ठेवण्यात आले आहेत. तर विमान सायन्स पार्कमध्ये आणल्यानंतर ते ठेवण्यासाठी जागेची साफसफाई, खोदकाम केले जात आहे. वास्तविक विमान सायन्स पार्क आवारात येण्यापूर्वी ही तयारी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळी विमान ठेवण्याची तयारी सुरू झाल्याने आगामी काळात हे विमान सायन्स पार्कमधील आकर्षण ठरणार असले, तरी सध्या अडथळा बनले आहे.

Web Title: Fighter aircraft in pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.