आयटी अभियंत्याच्या मृत्यू प्रकरणी सिल्वर स्पोर्ट्स क्लब व्यवस्थापनावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 07:27 PM2018-05-12T19:27:08+5:302018-05-12T19:27:08+5:30
जलतरण तलावावर लाईफ गार्डची नेमणूक न करता तलावाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून आयटी अभियंत्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सिल्वर स्पोर्ट्स क्लब व्यवस्थावनावर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी-चिंचवड (वाकड) : जलतरण तलावावर लाईफ गार्डची नेमणूक न करता तलावाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून आयटी अभियंत्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सिल्वर स्पोर्ट्स क्लब व्यवस्थावनावर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी मयत तरुणाचे वडील सत्यनारायण पोलय्या गट्टूपल्ली (वय ५०, रा.गुंटूर आंध्रप्रदेश) यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री पोहण्याचा सराव करताना स्पोर्ट्स क्लबच्या जलतरण तलावावर भार्गव सत्यनारायण गट्टूपल्ली (वय २४, रा हिंजवडी, मूळ गुंटूर आंध्रप्रदेश) या आयटी अभियंत्यांच्या मृत्यू झाला होता. भार्गव सराव करत असलेल्या सिल्वर स्पोर्ट्स क्लब मधील जलतरण तलावावर प्रशिक्षित लाईफ गार्ड नेमण्याची जबाबदारी क्लब व्यवस्थापनाची होती. मात्र य बाबीकडे दुर्लक्ष करीत हलगर्जीपणा करून माझ्या मुलाच्या मृत्यूस क्लब व्यवस्थापन कारणीभूत आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. भार्गवने या क्लबमध्ये पोहणे शिकण्याचा कोर्स लावून तो येथील ट्रेनर मार्फत पोहणे शिकले होते. मात्र अलीकडे कोर्स पूर्ण झाल्याने ते स्वतः तेथे सराव करायचे. या निमित्ताने खासगी जलतरण तलावातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.