मुलभूत सेवा स्मार्ट करण्यावर देणार भर
By admin | Published: March 5, 2017 04:23 AM2017-03-05T04:23:33+5:302017-03-05T04:23:33+5:30
पिंपरी चिंचवड शहराचा केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत समावेश करणेत आलेला असून आपले शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी अभियानाअतर्गत
पिंपरी: पिंपरी चिंचवड शहराचा केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत समावेश करणेत आलेला असून आपले शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी अभियानाअतर्गत निश्चित केलेल्या मुलभुत सेवा सुविधांचा स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावयाच्या आहेत. शहराचा स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करताना शहरातील नागरिकांच्या गरजांनुसार तयार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नागरिकांना आपली स्मार्ट सिटी कशी असावी याबाबत शहरातील नागरिकांच्या सूचना व मते जाणून घेण्यास सुरूवात केली आहे, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रथमत: प्रायोगिक तत्वावर शहरातील एखाद्या परिसराची निवड करावी लागणार आहे ज्या ठिकाणी ही योजना कमीत कमी कालावधीत राबविणे शक्य होईल. यासंदर्भातील आराखडा या महिनाअखेरपर्यंत केंद्र सरकारला सादर करायचा आहे. स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवड डॉट कॉम या संकेतस्थळाचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त अण्णा बोदडे, संगणक अधिकारी नीळकंठ पोमण आदी उपस्थित होते. यावेळी स्मार्ट सिटीबाबत करण्यात येणाऱ्या आराखडा आणि संकेतस्थळाचे सादरीकरण करण्यात आले.
शहरातील कोणत्या क्षेत्राची निवड स्मार्ट सिटी करीता मॉडेल म्हणून करता येईल यादृष्टीने एकूण नऊ परिसरांपैकी कोणतेही तीन पसंतीचे पर्याय निवडावयाचे आहेत. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी अंतर्गत निश्चित केलेल्या मुलभुत सुविधा स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा करण्यासाठी एकूण पाच पर्याय सुलभ नागरीसेवा, सुधारीत वाहतूक व्यवस्थापन, स्मार्ट पार्कींग, सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट व प्रदुषण नियंत्रण इत्यादीपैकी दोन प्राधान्यक्रमाने पर्यायाची निवड करावयाची आहे. स्मार्ट सिटी करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. (प्रतिनिधी)
नागरिकांसाठी मोबाईल अॅप
स्मार्टसिटीसंदर्भात नागरिकांच्या सूचना व मते नोदविण्यासाठी स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवड डॉट कॉम या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. त्यावर नागरिकांनी आपली मते व सूचना देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. नागरिकांना सहजतेने आपली मते व सूचना नोदविणेकरीता पालिकेमार्फत मोबाईल अॅप तयार केले आहे.